गोव्यात १२ फुटीर आमदारांना दिलासा! हायकोर्टाने अपात्रता याचिका फेटाळल्या, काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 12:41 PM2022-02-24T12:41:09+5:302022-02-24T12:50:14+5:30

12 Goa MLAs : काँग्रेसचे १० तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे २ आमदार आमदारकीचा राजीनामा न देताच भाजपमध्ये गेले होते.

HC dismisses pleas seeking disqualification of 12 Goa MLAs | गोव्यात १२ फुटीर आमदारांना दिलासा! हायकोर्टाने अपात्रता याचिका फेटाळल्या, काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार

गोव्यात १२ फुटीर आमदारांना दिलासा! हायकोर्टाने अपात्रता याचिका फेटाळल्या, काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार

Next

पणजी - आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये विधिमंडळ गट विलीन करुन पक्षांतर केलेल्या काँग्रेसच्या १० आणि मगोपच्या २ मिळून 'त्या' १२ फुटीर आमदारांविरुद्धच्या अपात्रता याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने फेटाळून लावल्या आहेत. मावळत्या विधानसभेत गोव्यातील १२ आमदारांना हा निवाडा दिलासादायक ठरला आहे त्याचबरोबर अन्य राज्यांमध्येही राजकारण्यांना तो महत्त्वपूर्ण ठरणार आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे व न्यायमूर्ती आर. एन. लढ्ढा यांच्या व्दिसदस्यीय खंडपीठाने अपात्रता याचिका फेटाळून लावताना सभापतींचा निवाडा उचलून धरला आहे.

काँग्रेस व मगोपने सभापती राजेश पाटणेकर यांनी एप्रिल २0२१ मध्ये फेटाळल्या होत्या. त्यास दोन्ही पक्षांनी हायकोर्टात आव्हान दिले होते. फुटीर आमदारांबरोबरच सभापतींनाही  प्रतिवादी केले होते. काँग्रेसचे १० तर महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे २ आमदार आमदारकीचा राजीनामा न देताच भाजपमध्ये गेले होते. दोन्हीकडच्या आमदारांनी आपापला विधिमंडळ गट दोन तृतियांश बहुमताने भाजपमध्ये विलीन केल्याचे जाहीर केले होते.

सभापतींनी अपात्रता याचिका फेटाळल्यावर प्रकरण हायकोर्टात गेले होते. पक्षांतरबंदी कायदा तसेच घटनेच्या दहाव्या परिशिष्टाचा भंग केल्या प्रकरणी या फुटीर आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली होती. दहाव्या परिशिष्टात कोणत्याही राजकीय पक्षाचा विधिमंडळ गट दोन तृतियांश बहुमताने दुसºया पक्षात विलीन करण्याची तरतूद नाही, असा याचिकादारांचा दावा होता तर दहाव्या परिशिष्टाचा योग्य अर्थ लावून सभापतींनी अपात्रता याचिका फेटाळल्याचे हायकोर्टाने निवाड्यात नमूद केले आहे.

अशी आहे पार्श्वभूमी

जुलै २०१९ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे दहा आमदार फुटून भाजपमध्ये गेले होते. काँग्रेस विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन केल्याचा त्यांचा दावा होता‌. या आमदारांमध्ये फिलीप नेरी रॉड्रिक्स, बाबूश मोन्सेरात, टोनी फर्नांडिस, इजिदोर फर्नांडिस, जेनिफर मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा, क्लाफासियो डायस, नीळकंठ हळर्णकर व फ्रान्सिस सिल्वेरा यांचा समावेश होता. त्याआधी मगोपमधून रातोरात बाबू आजगावकर व दीपक पाऊसकर हे फुटून भाजपमध्ये गेले होते. त्यानीही मगोप विधिमंडळ पक्ष भाजपात विलीन केल्याचे जाहीर केले होते. बाबू आजगांवकर आणि बाबू कवळेकर यांना सावंत सरकारने उपमुख्यमंत्रीपद दिले होते. तसेच अन्य काही फुटीरांना मंत्रिपदे दिली होती.

जनतेच्या दरबारातही न्याय मिळेल - कवळेकर

काँग्रेसी आमदार ज्यांच्या नेतृत्त्वाखाली फुटले ते बाबू कवळेकर यांनी प्रतिक्रिया देताना न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला. आता जनतेच्या दरबारातही न्याय मिळेल, असे म्हटले आहे. असत्य जास्त काळ टिकत नाही. आम्ही नेहमी सत्याच्याच मार्गाने गेलो. हा सत्याचा विजय आहे.

सुप्रीम कोर्टात आव्हान देणार - चोडणकर

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या निवाड्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, या निवाड्याने गोव्यातच नव्हे तर देशभरात चुकीचा पायंडा घातला. जनतेने दिलेला कौल झुगारुन पैसे घेऊन फुटण्यास लोकप्रतिनिधींना अशाने प्रोत्साहनच मिळेल. चोडणकर म्हणाले की, घटनेच्या दहाव्या परिशिष्टाचा हेतू घोडाबाजार रोखणे हाच आहे. आम्ही या निवाड्याला आव्हान देताना सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा करीत आहोत.’

 

Web Title: HC dismisses pleas seeking disqualification of 12 Goa MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.