लोकमत न्यूज नेटवर्क केरी-सत्तरी केरी-सत्तरी येथील घोटेली नं. एक येथील पोलिस चौकीच्या मागील वाळवंटी नदीच्या 'कळसकोण' या ठिकाणी रविवारी दुपारी १.३० च्या सुमारास केरी गावसवाडा येथील १६ वर्षीय विद्यार्थी दिपेश नामदेव गावस याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
दिपेश याने एप्रिल महिन्यात दहावीची परीक्षा दिली होती. काही दिवसांत निकाल जाहिर होणार होता. मात्र, तो पाहण्यापूर्वीच त्याने जगाचा निरोप घेतला. याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार गावसवाडा-केरी येथील दिपेश गावस त्याचे कुटुंब 'कळसकोण' या ठिकाणी अंघोळीसाठी आले होते. दीपेश आंघोळीसाठी पाण्यात उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे तो बुडू लागला. त्याला वाचविण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. त्याचा बुडून मृत्यू झाला होता.
दिपेश बुडाल्यानंतर स्थानिकांनी तातडीने १०८ रुग्णवाहिका बोलवली. वाळपई पोलिस व वाळपई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र ते पोहचण्याअगोदरच ग्रामस्थांनी त्याला पाण्यातून बाहेर काढले. त्याचा मृतदेह आधी साखळी इस्पितळात नेण्यात आला. त्यानंतर उत्तरीय तपासणीसाठी तो बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेजच्या इस्पितळात पाठवला.
दिपेश हा केरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी होता. त्याच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.