सूरज नाईकपवार मडगाव: रेल्वे इंजिनाच्या टपावर बसला अन जीव गमावून बसण्याची एक दुदैवी घटना गोव्याच्या मडगाव येथील कोकण रेल्वे स्थानकावर घडली. १६ नोव्हेंबरला मयताने वरील धाडस केले होते. निर्मोद लगून (२९) असे मयताचे नाव असून , तो मूळ झारखंड राज्यातील आहे. विद्युत वाहिनांचा स्पर्श झाल्याने तो होरपळला होता. नंतर त्याला गोमेकॉत उपचारासाठी दाखल केले होते. गेले पंधरा दिवस तो मृत्युझी झुंजत होता शेवटी त्याची प्राणज्योत मालवली.
निर्मोद हा झारखंडहून १६ नोव्हेंबरला गोव्यात कामासाठी आला होता. तो येथील गांधी मार्केट येथे रहात होता अशी माहिती कोकण रेल्वे पोलिसांनी दिली. तो वैफल्यग्रस्तही होता. त्याने दारुही प्याली होती असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
१६ नोव्हेंबर रोजी वालंकिणी ते वास्को रेल्वेने मडगावच्या कोकण रेल्वे स्थानकावर थांबा घेतला असता, निर्मोद त्या रेल्वेच्या इंजिन डब्याच्या टपावर चढला. त्याला विद्युत वाहिन्याचा स्पर्श झाल्याने तो गंभीर जखमी झाला. नंतर त्याला तातडीने उपचारासाठी इस्पितळात नेण्यात आले.संबधित घटनेची माहिती पोलिसांनी नंतर त्याच्या कुटुंबियालाही कळविली होती. मृतदेह संबधितांच्या स्वाधीन केला आहे.
अनैसर्गिक मृत्यू म्हणून पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. कोकण रेल्वे पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील गुडलर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक ए. गोम्स पुढील तपास करीत आहेत.