पणजी : गोव्यात दहावीच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी पथकाने आपला अंतरिम अहवाल शालांत मंडळाला सादर केला आहे. प्रश्न वादग्रस्तच होता आणि गरज नसताना अशा प्रकारे प्रश्न विचारला गेला, असे अंतरिम अहवालात म्हटले असून यावर शुक्रवारी गोवा बोर्डाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीतही एकमत झाले.
शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन रामकृष्ण सामंत म्हणाले की, ‘ बोर्डाच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या अंतरिम अहवालावर चर्चा करण्यात आली मात्र निर्णय अंतिम अहवाल हाती आल्यानंतरच घेतला जाईल. अंतिम अहवाल आल्यानंतर कार्यकारी मंडळाची मंजुरी मिळताच पुढील कारवाईसाठी सरकारला तो सादर केला जाईल. दहावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पोर्तुगीज नागरिकत्वाला प्रतिष्ठा देण्यासंबंधीच्या विचारलेल्या प्रश्नामुळे वाद निर्माण झाला होता. हा प्रश्न वादग्रस्तच होता आणि गरज नसताना अशा प्रकारे प्रश्न विचारला गेला, असे मत कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सर्वांनीच व्यक्त केल्याचे सामंत म्हणाले.
या प्रश्नात दोघांमधील संवाद असलेला हा प्रश्न अशा पद्धतीने व्याकरणावर आधारित होता आणि तो अशा पध्दतीने विचारला होता की, प्रश्नपत्रिकेत भारतीय नागरिकत्वाबद्दल अवहेलना झालेली होती. या संवादात एक दुस-याला सांगतो की गोव्यात नोकरीची संधी नाही त्यामुळे पोर्तुगीज नागरिकत्व घेऊन विदेशात नोकरी करण्याचा विचार केला आहे. दुसरा विद्यार्थी त्याला नंतर चांगला निर्णय असे सांगतो. या प्रश्नावरुन वाद निर्माण झाल्यानंतर चौकशीसाठी शिक्षण खाते आणि शालांत मंडळाने दोन स्वतंत्र चौकशी समित्या नियुक्त केल्या होत्या.