फोंडा - सुकतळे मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर पार्क करून ठेवण्यात आलेल्या ट्रकला,मागून धडक दिल्याने मोले येथील युवकाचा मृत्यू झाला आहे. सोमवारी रात्री बाराच्या दरम्यान सदर अपघात झाला आहे.
सविस्तर वृत्तानुसार मोले येथील तन्वेष उल्हास रेवणकर (वय 25) हा युवक नेहमीप्रमाणे वाघातोर बार्देश येथे आपल्या कामाच्या ठिकाणी जात होता. सुकतळे मोले येथे राष्ट्रीय महामार्गावर दोन दिवसापासून एक नादुरुस्त अवजडवाहू ट्रक पार्क करून ठेवलेला आहे. रात्रीच्या वेळी सदर ट्रकचा अंदाज तन्वेश याला आला नाही. त्याने भरधाव वेगात आपली ओला दुचाकीवरून ट्रकच्या मागच्या भागाला धडक दिली. सदर धडकेत त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तन्वेषा नेहमी हेल्मेट परिधान करूनच कामाला जात असतो. फक्त कालच त्याने हेल्मेट परिधान केले नव्हते आणि नेमके त्याच वेळी त्याला अपघात झाला व अपघातात जीव गमवावा लागला.
सदर अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी अपघात स्थळी धाव घेतली. काही दिवसापासून सदर ट्रक हलवण्यासंबंधी लोकांनी मागणी केली होती. सदर ट्रक मुळे अपघात होणार असल्याची भीती सुध्दा लोकांनी व्यक्त केली होती. असे असतानाही ट्रक न हलवल्याने लोकांचा राग अनावर झाला. रात्रीच लोकांनी रस्ता रोको करून वाहतूक राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला.
कुळे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सुकतळे येथे धाव घेतली. सर्वप्रथम अपघाताचा पंचनामा करून शवविच्छेदन मृतदेह मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात पाठवून देण्यात आला. इकडे लोकांनी मात्र प्रशासनाच्या विरुद्ध रोष व्यक्त केला व रस्ता रोको चालूच ठेवला. संतप्त झालेल्या लोकांनी अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकची मोडतोड सुद्धा केली. कुळे पोलिसांनी नंतर लोकांची कशीबशी समजूत काढल्यानंतर पहाटे चार वाजता तिथून जमाव पांगला गेला.