वास्को : शस्त्र कायद्या अंतर्गत पंजाब पोलीसांना पाहीजे असलेला काश्मीर सिंग नामक आरोपी शनिवारी (दि.२३) पहाटे दाबोळी विमानतळावरून शारजा जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडून दाबोळी विमानतळ पोलीसांच्या ताब्यात दिला. पंजाब येथील मूळ काश्मीर सिंग याला दाबोळी विमानतळ पोलीसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांने शौचालयात जाण्याचा बहाणा करून पोलीसांच्या हातावर तुरी देऊन तो फरार झाला. काश्मीर सिंग यांने शौचालयाच्या मागील दहा फूट उंचीच्या भिंतीवरून उडी मारून तेथून तो फरार झाल्याची माहीती पोलीसांकडून मिळाली.
शनिवारी पहाटे ४.३० च्या सुमारास ती घटना घडली. पंजाब येथील काश्मीर सिंग नामक ३४ वर्षीय तरुण ‘एअर अरेबीया’ च्या विमानाने शारजा जाण्यासाठी दाबोळी विमानतळावर येऊन पोचला. विमानतळावर ‘चेक इन’ मध्ये काश्मीर सिंग याच्या पासपोर्ट इत्यादी गोष्टींची तपासणी चालू असताना पंजाब पोलीसांनी त्याच्याविरुद्ध ‘लूक आऊट सरक्युलर’ जारी केल्याचे उघड झाले. पंजाबमध्ये घडलेल्या चोरी प्रकरणात आणि शस्त्र कायद्याच्या अंतर्गत काश्मीर सिंग पंजाब पोलीसांना पाहीजे असल्याचे दाबोळी विमानतळावरील इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी त्वरित कारवाई करून त्याला ताब्यात घेतला. त्यानंतर त्याला केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दलाच्या ताब्यात दिल्यानंतर त्यांनी योग्य कारवाई करून त्याला दाबोळी विमानतळ पोलीसांच्या ताब्यात दिला. दाबोळी विमानतळ पोलीसांनी काश्मीर सिंग याला ताब्यात घेतल्यानंतर ते त्याप्रकरणात उचित कारवाई करत असताना काश्मीर सिंग याने आपल्याला उलट्या येत असून पोटात बरे नसल्याचे सांगून शौचालयात जाण्याची विनंती केली. तो पहील्यांदा शौचालयात जाऊन आल्यानंतर काही वेळाने त्यांनी पुन्हा शौचालयात जाण्याची विनंती केली.
दुसऱ्यांदाही तो शौचालयात जाऊन परतला. त्यानंतर तिसऱ्यांदा शौचालयात जाण्याची विनंती करून तो गेल्यानंतर त्यांने शौचालयामागे असलेल्या सुमारे १० फूट उंचीच्या भिंतीवरून बाहेर उडी मारून तेथून पोबारा काढला. काश्मीर सिंग यांने शौचालयाच्या मागच्या भिंतीवरून उडी मारून तो फरार होत असल्याचे त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी ड्युटीवर असलेल्या पोलीसांना समजताच त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. काश्मीर सिंग याने भिंतीवरून उडी मारल्यानंतर तो दाबोळी महामार्गावर पोचून नंतर बाजूला असलेल्या रेल्वे रुळावर पोचून तेथून तो गायब झाला. पंजाब पोलीसांना पाहीजे असलेला आरोपी काश्मीर सिंग यांने दाबोळी विमानतळ पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा काढल्याचे समजताच त्याला पकडण्यासाठी पोलीसांनी सर्व मार्गाने त्याचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता अशी माहीती पोलीस सूत्रांकडून मिळाली असून त्याला गजाआड करण्यासाठी पोलीस यंत्रणे सर्व मार्गाने त्याचा शोध घेत आहेत. एका चोरी प्रकरणात दोन संशयित आरोपींना पंजाब पोलीसांनी गजाआड केल्यानंतर त्या चोरी प्रकरणात काश्मीर सिंग नामक तरुणाचा सहभाग असल्याचे पंजाब पोलीसांना कळताच त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. काश्मीर सिंग विरुद्ध पंजाब येथील पोलीस स्थानकावर शस्त्र कायद्याच्या अंतर्गतसुद्धा गुन्हा नोंद आहे. काश्मीर सिंग याला पकडण्यासाठी पंजाब पोलीसांनी ‘लूक आऊट सरक्युलर’ जारी केल्यानंतर शनिवारी पहाटे त्याला दाबोळी विमानतळावर इमिग्रेशन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊन पोलीसांच्या हवाले केला होता. दाबोळी विमानतळ पोलीसांच्या ताब्यात असलेला काश्मीर सिंग शौचालयात गेल्यानंतर शौचालयाच्या मागे असलेल्या भिंतीवरून उडी मारून तो फरार झाल्याचे कळताच पोलीसांनी त्याला गजाआड करण्यासाठी त्याचा शोध घेण्यास सुरवात केली आहे. दाबोळी विमानतळ पोलीसांच्या ताब्यातून फरार झाल्याने काश्मीर सिंग विरुद्ध दाबोळी विमानतळ पोलीसांनी भादस २२४ कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. दाबोळी विमानतळ पोलीसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या काश्मीर सिंग विरुद्ध पंजाब मधील पोलीस स्थानकावर भादस ३७९, ४११, ३८२ आणि पंजाब पोलीसांच्या शस्त्र कायद्याच्या २५ कलमाअंतर्गत गुन्हा नोंद आहे. काश्मीर सिंग याला गजाआड करण्यासाठी गोवा पोलीसांनी त्याच्या विरुद्ध आता ‘लूक आऊट नोटीस’ जारी केली आहे. - श्री. सलीम शेख, पोलीस उपअधीक्षक.