पणजी : एक-तृतियांश कर्करोग रुग्ण डोके आणि मानेच्या कॅन्सरने त्रस्त असतात, अशी माहिती मुंबईतील टाटा मेमोरियल इस्पितळाचे संचालक तथा आघाडीचे शल्यविशारद डॉ. अनिल के. डिक्रुझ यांनी येथे दिली. बदलती जीवनशैली हे कारण आहेच, त्याचबरोबर ४0 ते ५0 टक्के रुग्णांना कर्करोग तंबाखु सेवनामुळेच होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तंबाखु सेवनावर नियंत्रणासाठी प्रभावी कायद्याची गरज त्यांनी व्यक्त केली तसेच तंबाखुजन्य पदार्थांवरील कर आणखी वाढविणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.गोवा कॅन्सर सोसायटीने आयोजित केलेल्या उपक्रमांतर्गत गोमेकॉतील डॉक्टर, विद्यार्थी, सल्लागार डॉक्टर यांच्यासाठी त्यांनी व्याख्यान दिले. सुमारे ८0 डॉक्टर यात सहभागी झाले होते. डॉ. डिक्रुझ म्हणाले की, जागतिक आरोग्य संघटनेचे एक अनुमान असे सांगते की पुढील १0 वर्षात विकसनशील देशांमध्ये कर्करोगाचे प्रमाण दोन-तृतियांश होणार आहे. आजपावेतो विकसित देशांमध्ये प्रमाण जास्त आढळून आलेले आहे त्यास बदलती जीवनशैली हे कारण आहे. आता हे लोण विकसनशील देशांमध्येही पोचले आहे. शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तंबाखुपासून दूर ठेवले पाहिजे. सरकार केवळ सिगारेटवर कर वाढवते परंतु गुटखा तसेच अन्य तंबाखुजन्य पदार्थांकडे दुर्लक्ष करते. तंबाखुयुक्त पदार्थांवर कर वाढविणे हा एक उत्तम पर्याय आहे.गोव्यात दरवर्षी कर्करोगाचे १२00 नवे रुग्णदरम्यान, गोव्यात आतड्यांच्या आणि महिलांमध्ये स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण लक्षणीय असल्याचे गोवा कॅन्सर सोसायटीचे संयुक्त सचिव तथा आघाडीचे कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले. राज्यात दरवर्षी कर्करोगाचे १२00 नवे रुग्ण येतात आणि ६00 जणांचा कर्करोगाने मृत्यू होतो, अशी माहिती त्यांनी दिली. १२00 पैकी १५0 रुग्ण आतड्यांच्या कर्करोगाचे तर किमान २00 महिला रुग्ण स्तनाच्या कर्करोगाने त्रस्त असतात.स्तनाचा कर्करोग टाळण्यासाठी महिलांनी वयाच्या ३0 वर्षापूर्वी लग्न करुन मूल होऊ देणे तसेच सहा महिने ते दोन वर्षे मुलांना स्तनपान करणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सर्वांनीच तंबाखु, दारु टाळणे, व्यायाम करणे, जलतरण, सायकल चालविणे, भरपूर भाज्या खाणे हे प्रतिबंधात्मक उपाय आहेत. पहिल्या टप्प्यात निदान झाल्यास ९0 टक्के रुग्ण पूर्णपणे बचावतात. दुसºया टप्प्यात ८0 टक्के, तिसºया टप्प्यात ५0 टक्के बचावतात तर चौथ्या टप्प्यात बचावण्याचे प्रमाण ५ टक्क्यांहून कमी असते,असे त्यांनी सांगितले.गोवा कॅन्सर सोसायटीने हाती घेतलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देताना संस्थेचे संयुक्त सचिव डॉ. शेखर साळकर यांनी २0१६-१७ या आर्थिक वर्षात ४१९ रुग्णांची संस्थेतर्फे तपासणी झाली. रुग्णांना ५0 हजार रुपयांपर्यंत खर्च संस्था देते आणि मणिपाल इस्पितळात शस्रक्रिया केल्यास आणखी ५0 हजार रुपये दिले जातात. गेल्या आर्थिक वर्षात मणिपाल इस्पितळात ३५ रुग्णांनी व इतर इस्पितळांमध्ये ८ रुग्णांनी मिळून एकूण १५ लाख रुपयांचा लाभ घेतला. २0१७-१८ या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत मणिपाल इस्पितळात १९ तर अन्य इस्पितळांमध्ये ५ रुग्णांनी मिळून ५ लाख रुपयांचा लाभ घेतला. अखेरच्या घटका मोजणाºया कर्करुग्णांसाठी काम करणाºया दिलासा केअर युनिटला १0 लाख रुपये देणगी दिली. संशोधनासाठी डॉ. अनुपमा मुखर्जी यांना ५ लाख रुपये संस्थेने पुरस्कृत केल्याची माहिती साळकर यांनी दिली.
डोके आणि मानेच्या कर्करोगाचे रुग्ण एक-तृतियांश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 8:14 PM