ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 01 - कोट्यवधींचे बक्षीस लागले म्हणून गोमंतकीय महिलेला लाखोंचा गंडा घालणा-या दोघा नायजेरियन नागरिकांना नवी दिल्ली येथे जाऊन अटक करण्याची कामगिरी गोवा पोलिसांनी यशस्वीपणे बजावली असली तरी अटक करून आणल्यानंतर कोठडीतील तपासादरम्यान हे संशयित तपासाला अजिबात सहकार्य करीत नसल्यामुळे पोलिसांची पंचाईत झाली आहे.
पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद पडल्यावर भल्या भल्यांची बोबडी वळते आणि पोपटासारखे पटापटा बोलू लागतात. परंतु नायजेरियन माणसे ही असे काही रसायन आहे की कितीही शारिरीक पीडा सोसूनही ते काही बोलत नाहीत. बोललेच तरी भलतेच काही तरी दिशाभूल करणारे बोलतात. त्यामुळे यांचे करावे काय असा प्रस्न पोलिसांना पडत असतो. गोव्यातील महिलेला कोट्यवधी रुपयांची भेट वस्तु पाठवितो असे सांगून ८ लाख रुपयांची फसवणूक करणा-या नायजेरियनच्या बाबतीतही गोवा सायबर गुन्हे विभागाला हाच अनुभव येत आहे. अटक करण्यात आलेले दोघेही संशयित काहीही बोलायला तयार नाहीत. ज्या प्रश्नांची उत्तरे देण्यास त्यांना अडचण होते त्या प्रश्नांना ते उत्तरे देतच नाहीत. तसेच काही प्रश्नांना भलतीच उत्तरे देतात. मूळ सूत्रधार लंडनमध्ये आहे वगैरे गोष्टी सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. सायबर विभागाचे अधीक्षक कार्तिक कश्यब यांनीही नायजेरियन संशयितांच्या असहकाराबद्दल पुष्टी दिली. हे कोणतीही माहिती देऊ पाहत नाहीत असे त्यांनी सांगितले.
दरम्यान या दोन्ही संशयितांची कोठडीतील चौकशी झालेली आहे. त्यांची पोलिसांकडून आणखी कोठडी मागण्याची शक्यता कमी आहे, तसेच कोठडी मागूनही काही फायदाही होईल असे पोलिसांना वाटत नाही. इतर दहा राज्यांच्या पोलिासांना हे दोघेही संशयित हवे आहेत. पैकी ओरिसातील कटक येथील पोलिसांनी त्यांच्या कोठडीची मागणी केली आहे. न्यायालयाने परवानगी दिल्यास त्यांना कटक पोलिसांच्या स्वाधीन केले जाईल. तसेच तेलंगणा पोलिसांनीही त्यांची कोठडी मागितली आहे.