पणजी : राज्यात मंगळवारी ७ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शहरी भागात जेथे वृद्ध मतदारांची टक्केवारी जास्त आहे अशा ठिकाणी ८ मॉडेल मतदान केंद्रे उघडण्यात आली असून ज्येष्ठ मतदार आरोग्य तपासणीच्या मूलभूत सुविधेचा लाभ येथे घेऊ शकतात. मुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आयोग सज्ज आहे. राज्यभरात एकूण १७२५ मतदान केंद्रे उभारण्यात आली असून उत्तरेत ८६३ आणि दक्षिणेत ८६२ मतदान केंद्रे आहेत. उत्तर गोव्यात ४३ आणि दक्षिण गोव्यात ४५ मॉडेल मतदान केंद्रे आहेत. मतदान प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आणि प्रतीक्षा कालावधी कमी करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिलांसाठी ४० पिंक बूथदोन्ही जिल्ह्यांमध्ये महिलांसाठी ४० (प्रत्येकी २०) समर्पित मतदान केंद्रे (पिंक बूथ) असतील. या केंद्रांवर केवळ महिला कर्मचारीच असतील. ज्यामुळे महिला मतदारांना त्यांच्या लोकशाही अधिकारांचा वापर करण्यासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण मिळेल. दोन्ही जिल्ह्यांमध्ये ४० हरित मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. हे इको-फ्रेंडली बूथ स्थानिक विक्रेत्यांकडील बांबू आणि नारळाच्या पानांसारख्या पर्यावरणीय टिकाऊ सामग्रीचा वापर करून सजवलेले आहेत. मतदारांना हिरवेगार पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी ७५०० रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. मतदान केंद्र उभारल्यानंतर लगेचच मतदान पथकाकडून वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येईल.
ज्येष्ठ नागरिकांना मतदानानंतर आरोग्य तपासणीची सोय, ८ मॉडेल मतदान केंद्रे
By किशोर कुबल | Published: May 05, 2024 3:33 PM