- नारायण गावस
पणजी : राज्यात उष्णता प्रचंड वाढली असून हा यंदाचा एप्रिल महिना आणखी उष्णता वाढविणार असल्याची शक्यता आहे. सध्या वाढत्या उष्णतेमुळे आरोग्यावर परिणाम जाणवत आहेत. अनेक लोकांना थंडी तसेच तापासारखे आजार पुन्हा वाढू लागले आहेत. या वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी आरोग्य खात्यानेही काही सुचना जाहीर केल्या आहेत.
यंदाचा हा उन्हाळा देशभरात अति उष्णता ठरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पण, या उन्हाळ्याबरोबर आता आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. सध्या राज्यात अनेकांना थंडी खोकला या सारखे आजार झाले आहेत यात लहान मुले तसेच वयस्क लोकांमध्ये जास्त आजार दिसून येत आहेत. कडाक्याच्या उष्णतेमुळे धूळ प्रदूषण वाढले आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्याही आता वाढलेल्या आहेत. निवडणूकांच्या काळात राजकारणी तसेच सर्वसामान्य लोक आजारी पडत आहे.
वाढत्या उष्णतेवर गोवा वेधशाळा लक्ष ठेऊन आहे. यंदा एप्रिलमध्ये काही प्रमाणात उष्णता जास्त वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य खात्यानेही काही सूचना जाहीर केल्या आहेत. हवामान खात्याकडून उष्णतेविषयी काही सूचना करायच्या असेल तर आम्ही नक्कीच करणार आहोत. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी, असे गोवा वेधशाळेचे संचालक नहूष कुलकणी यांनी सांगितले. वाढत्या उष्णतेमुळे सध्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहेत. त्यामुळे लोकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. थंडी खोकला सारखा आजार अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच, होईल तेवढे या उष्णतेपासून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करावा, असे डॉ. महेश वेर्लेकर यांनी सांगितले.