पणजी : गोव्यात आरोग्य क्षेत्रात खासगी आणि सरकारी भागीदारीने लोकांच्या आरोग्याची काळजी यापुढे घेतली जाणार आहे. दीनदयाळ स्वास्थ्य योजना ही त्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल असल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी विधानसभेत शुक्रवारी सांगितले. आमदार नरेश सावळ यांच्या आरोग्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी दीनदयाळ स्वास्थ्य योजना हे लोकांना उत्कृष्ट आणि स्वस्तात आरोग्य सेवा मिळविण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल असल्याचे सांगितले. गोवा वैद्यकीय महाविद्यालय ही देशातील सर्वाधिक आरोग्य सुविधा असलेली आरोग्य संस्था असली तरी त्यावर मर्यादा या असतातच. त्यामुळे खासगी क्षेत्राने या कामात योगदान द्यावे आणि त्याचा फायदा लोकांना मिळावा या उद्देशाने ही योजना खासगी क्षेत्राला खुली करण्यात आल्याचे ते म्हणाले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यात आणखी मुद्दे जोडताना खासगी इस्पितळांनी आता साधनसुविधा वाढविण्याचे आणि अधिक सेवा सुरू करण्याचे हे दिवस असल्याचे सांगितले. स्वास्थ्य विम्यामुळे आता सामान्य माणूसही खासगी इस्पितळात जाऊ शकणार आहे. खासगी आणि सरकारी भागीदारीनेच चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा यापुढे लोकांना मिळणार आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
यापुढे खासगी-सरकारी भागीदारीने आरोग्य सेवा
By admin | Published: August 13, 2016 2:01 AM