लोकमत न्यूज नेटवर्क, वाळपई : येथील होंडा औद्योगिक वसाहतीजवळील पुनिस्का इंजेक्टेबल प्रा. लि. या फार्मास्युटिकल कंपनीच्या गोदामाला गुरुवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीची माहिती मिळताच वाळपईसह डिचोली अग्निशमन दलाच्या बंबांनी सुमारे ६ तास अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
होंडा औद्योगिक वसाहतीनजीकच्या पुनिक्सा इंजेक्टेबल कंपनीतून सलाईन, वैद्यकीय साहित्याचे उत्पादन केले जाते. येथील कंपनीच्या गोदामाला पहाटे भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाच्या बंबांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीचे स्वरुप मोठे असल्याने डिचोली अग्निशमन दलाचेही बंब मागविण्यात आले. सकाळी उशीरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. गोदामात रासायनिक द्रव्यांचे बॉक्स होते. एका जेसीबीने ते बाहेर काढण्यात आले. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचेही कारण स्पष्ट झालेले नाही.