लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: म्हापसा राज्यात अतिवृष्टी सुरू आहे. पण बार्देश तालुक्यातील बहुतांश भागातील नळ गेल्या पाच ते सहा दिवसांपासून कोरडे पडल्याने लोकांत प्रचंड संताप पसरला आहे. सरकार सुस्त बनले आहे व त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले. असे महिलांनी सांगितले, भरपावसात गेल्या ६ दिवसांपासून पाण्यासाठी बादेशवासीयांची वणवण सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ म्हापशातील महिलांनी रिकाम्या घागरी व बादल्या घेऊन रस्त्यावर उतरत निदर्शने केली.
याविषयी ॲनी परेरा म्हणाल्या की, मागील सहा दिवसांपासून आम्हाला तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाण्याअभावी आमची मोठी गैरसोय तसेच आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दररोज पदरचे पैसे मोइन टैंकर मागवण्याची वेळ आली आहे. सरकारला साधे पाणी देण्यास जमत नाही. पण नेमका विकास कोणाचा सुरू आहे? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
आम्ही पावसाचे पाणी वापरतोय. तर पैसे मोजून पिण्याचे पाणी विकत आणतोय. सावांखाच्या कार्यालयात विचारपूस करण्यास गेल्यास तिथे कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. सरकारने तातडीने पुरवठा सुरु करावा, अशी मागणी माधवी यांनी केली.
अस्नोड्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पात कच्चे पाणी खेचणारी मुख्य जलवाहिनी दुरुस्त करण्यात आली होती. वीज पुरवठ्यासाठी वापरले जाणारे तसेच नादुरुस्त झालेले आरएमव्ही युनिट बदलून त्या जागी दुसरे युनिट बसवण्यात आले आहे. बसवलेले युनिट जुनेच वापरण्यात आले आहे. नवीन युनिट उपलब्ध नसल्याने तसेच ते मागवून घेण्यास विलंब होण्याची शक्यता असल्याने गैरसोय दूर करण्यासाठी जुने बसवण्यात आल्याची माहिती वीज खात्याकडून देण्यात आली.
मुले व शिक्षकांनाही सुट्टी
हवामान खात्याने दिलेल्या जोरदार पावसाच्या अलर्टनंतर खबरदारीचे उपाय म्हणून राज्यातील सर्व प्राथमिक इयत्तेपासून विद्यापीठापर्यंतच्या सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बुधवारी दिवसभर ४ इंच इतका जोरदार पाऊस पडल्यामुळे राज्यभर व्यवहार ठप्प झाले. गुरुवारीही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजावरून मिळत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केवळ ज्या विद्यालयात किंवा महाविद्यालयात गुरुवारी परीक्षा वगैरे ठरलेल्या आहेत, त्या मात्र होतील अशा संस्था बंद राहणार नाहीत, असे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर यांनी कळविले आहे. काही अभियांत्रिक महाविद्यालयात गुरुवारी परीक्षा असून अशा महाविद्यालयांना सुटी असणार नाही.
पावसामुळे अडथळे
नादुरुस्त झालेली भूमिगत वीज वाहिनी दुरुस्त करण्याचे काम सुरु होते. मंगळवारी पडलेल्या सततच्या पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळे निर्माण झाले होते. सध्या ओव्हरहेड वाहिनीद्वारे प्रकल्पाला पुरवठा केला जात आहे. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर भूमिगत वाहिनीतून पुरवठा सुरु केला जाणार आहे.
गढूळ पाण्यामुळे वेळ
बार्देश तालुक्यातील संकट काही अंशी दूर झाले असले तरी अनेक भागात गढूळ पाणीपुरवठा सुरुच होता. आज गुरुवारपर्यंत त्यात आणखीन सुधारणा होण्याची शक्यता पाणी विभागाकडून वर्तवण्यात आली. तिळारीतून होत असलेला पुरवठा गढूळ असल्याचे जलशुद्धीकरणास समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे पुरवठा नियोजनानुसार करणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.
ओहळ पार करताना महिला गेली वाहून; दुसरी बचावली
धुवांधार पावसामुळे ओहळात वाढलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ओहळ पार करताना नाकेरी येथे दोन महिला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. एक महिला झाडाच्या फांदिला अडकल्यामुळे वाचली तर दुसरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती आहे. कटा-फातर्पा येथील फ्लोरिन डिसोझा (५६) व नाकेरी येथील रोजालीन सिमोईश (५०) या महिला शेतात गेल्या होत्या. पाय घसरुन दोघी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या. दैवबलवत्तर म्हणून रोझालीना ही एका झाडाच्या फांदीला पकडून राहिली. नंतर स्वतःच वर आली. तोपर्यंत फ्लोरिन ही दिसनासी झाली होती. रात्री उशिरा पासून बचाव दल बेतूल येथे तिचा शोध घेत होते.