लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात कालपासून मान्सूनने जोर धरला आहे. शनिवारीही जोरदार सलामी दिली. राज्यभर पावसाची संततधार सुरूच होती. गेल्या २४ तासांत दोन इंच तर शनिवारी १२ तासांत जवळजवळ तितकाच पाऊस पडला आहे. त्यातच वेगाने बदलणाऱ्या हवामानाचा अंदाज घेऊन हवामान खात्याने राज्यात आज आणि उद्या 'सतर्क राहा, सज्ज राहा' असा संदेश देणारा ऑरेंज अलर्टही जारी केला आहे.
शनिवारी सकाळीच पावसाने जोर धरला होता. त्यामुळे अनेक भागात झाडे पडण्याच्या घटनाही घडल्या उत्तर आणि दक्षिण गोव्यात अशा सर्व भागात पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हवामान खात्याच्या रडारद्वारे प्राप्त छायाचित्रात गोव्याच्या आकाशात पावसाच्या ढगांची दाटी झालेली दिसत आहे. दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.
फोंड्यात पूरसदृश स्थिती
फोंड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती होती. पोलिस स्थानकाबाहेर पाणी तुंबून राहिल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. कोरगाव- पेडणे येथे वडाचे झाड पडून निवारा शेडचे नुकसान झाले आहे. पीर्ण येथे घरावर झाड कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली. सर्वांच्या नजरा असलेल्या पणजी शहरात पावसामुळे गैरसोय झाली.
स्कायमेटचे अंदाज ठरला फोल
६ जुलैपर्यंत मान्सून सक्रिय होणार नाही आणि त्यामुळे २१ दिवस कोरडे जातील, असे अंदाज वर्तविणाचा खासगी एजन्सीचे अंदाज फोल ठरले आहेत, भारतीय हवामान खात्याने स्कायमेटच्या अंदाजावर मौन बाळगले होते, ते मौनच जोरदार सरींच्या रुपाने बोलते झाले आहे.
वॉर्निंग व अलर्ट म्हणे काय?
भारतीय हवामान खाते पावसाचा अंदाज वर्तविताना सांकेतिक भाषेत लोकांना आणि प्रशासनालाही सतर्क करत असते. ही सांकेतिक भाषा म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या वॉर्निंग आणि अलर्ट जारी केले जातात.
तूट भरून निघत आहे
एरव्ही लांबणीवर पडलेला मान्सून आगमनानंतर कमजोर पडल्यामुळे राज्यात मोठी मान्सून तुट निर्माण आली होती. २२ जूनपर्यंत ७२ टक्के मान्सून तूट होती. दोन दिवसांच्या जोरदार सरींमुळे ही तूट ८ टक्क्यांनी भरून ६४ टक्क्यावर आली आहे. पावसाचा धडाका कायम राहिल्यास महिना अखेर ही तट मोठ्या प्रमाणावर भरली जाण्याची शक्यता आहे. आतापर्यंत १० इंच पावसाची नोंद झाली आहे.
घरावर झाड पडले
म्हापसा मायणा पिळण येथे शनिवारी सकाळी ७:३० च्या दरम्यान सद्गुरु मंदिराच्या शेजारी असलेल्या आनंद नाईक यांच्या घरावर विचेचे झाड पडून मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच रामा नाईक यांच्या नेतृत्वाखाली पिळण अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत झाड हटवले.