पणजी : गुरुवारी अरबी समुद्रावरील हवामानात अचानक बदल झाल्यामुळे राजधानी पणजीसह राज्याच्या सर्वच भागांत जोरदार पाऊस पडला. त्यामुळे उष्म्याच्या प्रकोपाला कंटाळलेल्या गोमंतकीयांना दिलासा मिळाला. हा पाऊस आणखी चार दिवस बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याचा धोका असल्याने बळीराजा मात्र धास्तावला आहे. गोव्यातील किनारपट्टी भागात अधिक पाऊस पडला. दुपारी उष्मा वाढल्यामुळे सायंकाळी पाऊस पडणार, असा तर्कही केला जात होता. दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळू लागल्या. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस पडला. पणजी व राज्यात इतर ठिकाणी त्यामुळे वीजही खंडित झाली. अचानक पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडीही झाली होती. पर्वरीत ओ कोकेरो सर्कलजवळ, म्हापसा येथे वृंदावन इस्पितळाजवळील बायपास रस्त्यावर तसेच पणजीत दिवजा सर्कलजवळ बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. भरदिवसा अंधारल्यामुळे वाहनधारकांना वाहनांच्या हेडलाईट्स चालू ठेवाव्या लागल्या. मोसमी पाऊस ३० सप्टेंबरला संपत असतो. त्यामुळे गुरुवारी पडलेला पाऊस हा पावसाळ्यानंतरचा पाऊस ठरला आहे. हा पाऊस चार दिवस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. खात्याचे शास्त्रज्ञ एन. हरिदासन यांनी याविषयी सांगितले की, वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रकारामुळे हा पाऊस पडला आहे. अरबी समुद्रपट्ट्यात उंच भागातील हवामानात वाढ झाल्यामुळे कॉन्व्हेक्शनल स्वरूपाचा पाऊस पडला. वातावरण बदलण्यासाठी किमान चार दिवस लागतील आणि तोपर्यंत पावसाच्या हलक्या सरी विशेषकरून किनारी भागात कोसळतील. (प्रतिनिधी)
मुसळधार पावसाचा दिलासा
By admin | Published: October 02, 2015 2:37 AM