पणजी : हवामान खात्याचे अंदाज फोल ठरवित पावसाने मंगळवारी रात्री राज्याच्या विविध भागांत जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. हवामानात झालेल्या अचानक बदलामुळे हा पाऊस पडल्याचा दावा हवामान खात्याने केला आहे.पणजी, म्हापसा, वास्को, मडगाव, डिचोली, सांगे, केपे, फोंडा, काणकोण व इतर ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. अचानक पडलेल्या पावसामुळे बराच गोंधळही उडाला. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला. सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे काही ठिकाणी झाडेही पडल्याचे कॉल्स आल्याची माहिती अग्निशामक दलाकडून देण्यात आली. पणजीत मांडवी पुलाजवळ झाड पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. स्थानिक हवामानातील आकस्मिक बदलामुळे हा कॉन्वेक्शनल पाऊस असल्याचे हवामान खात्याचे शास्त्रज्ञ एच. हरिदासन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हवामान बदलामुळे राज्यात जोरदार पावसाची सलामी; वीजपुरवठा खंडित
By admin | Published: May 06, 2015 2:21 AM