लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्याला सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले. काल सकाळपासूनच सर्वत्र धो धो पाऊस सुरू होता. पावसामुळे नद्या तुडुंब भरल्या आहेत, तर स्मार्ट सिटी पणजीसह राज्यभरातील सर्वच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसून आले. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. तिसवाडीसह बार्देश, डिचोली, फोंडा, वास्को, मडगाव, काणकोण भागात मोठ्या प्रमाणात झाडे पडण्याच्या घटना घडल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी सतर्कता दाखवत रात्री उशिरापर्यंत झाडे हटविण्याचे काम सुरू होते. पडझडीमुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसाने ९ व्या दिवशीही कायम ठेवताना इंचांच्या अर्धशतकाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
तब्बल ७२ टक्के मान्सून तूट भरून काढून सहा टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी ८:३० पर्यंत ४७ इंच सरासरी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस पडला. राज्यातील स्वयंचलित ६ पर्जन्यमापक केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ८:३० ते रात्री उशिरापर्यंत ३ इंचाहून अधिक पाऊस पडला.
झाड पडून घराचे नुकसान; वृद्धा जखमी
फातेपूर-जुवे येथे एका घरावर झाड पडून तीन लाखांची हानी झाली. या घटनेत कातारिना रोड्रिग्स ही ६३ वर्षीय वृद्धा जखमी झाली. उपचारासाठी तिला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मिगेल बाप्तिस्ता यांच्या मालकीचे हे घर आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत झाडाच्या फांद्या हटविताना साडेतीन लाखांची मालमत्ता बचावली.
नऊ दिवसांत ३१ इंच
मागील नऊ दिवस हे पूर्णपणे पावसाचे राहिले. या नऊ दिवसांत दोन इंचापेक्षा कमी पाऊस पडलाच नाही. त्यातही सहा दिवस असे गेले जेव्हा दोन इंचापेक्षा अधिक पाऊस पडला. तसेच २८ जूनला ६ इंच, तर ५ जुलै रोजी ५ इंच इतका पाऊस पडला. नऊ दिवसांत सरासरी दिवसाला साडेतीन इंच इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला.
जनजीवन विस्कळीत
गेल्या २४ तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक रस्ते पाण्याखाली गेले, तर काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. दरडी मोठ्या प्रमाणात २ कोसळण्याच्या घटना घडल्या. काही भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच मोठी झाडे पडून घरांचे, झाले. तसेच रस्त्यावर झाडे पडून वाहनांना अडथळा निर्माण झाला. पणजी राजधानीप्रमाणे ३ म्हापसा गिरी येथील मुख्य रस्त्याशेजारी शेतात पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली. तसेच ताळगावात काही घरांमध्ये पाणी शिरले. पणजीतील डॉन बॉस्को विद्यालयाजवळील ठाकूर पेट्रोलपंप येथील सुमारे ४० ते ५० वर्षे जुने झाड पडले. यात नरहर ठाकूर यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच भाजपच्या कार्यालयाजवळ एक मोठे झाड पडून एका वाहनाचे नुकसान झाले.
अतिरिक्त पाऊस ७ टक्के
पावसाच्या या झंझावातामुळे तब्बल ७२ टक्के तूट भरून निघून उलट सात टक्क्यांहून अधिक अतिरिक्त्त पाऊस गोव्यात नोंद झाला आहे. राज्यातील धरणेही वेगाने भरताना दिसत आहेत. आमठाणे ५६ टक्के, चापोली ४८ टक्के, पंचवाडी ४० टक्के, तर साळावली धरण ४२ टक्के भरले आहे.