पणजीः जोरदार पावसाने राज्याला झोडपून टाकताना रविवारी अवघ्या ५ तासांत सरासरी ४ इंचाहून अधिक पाऊस कोसळला. जुने गोवेत पावसाचा कहर होऊन ७ तासात ६ इंचाहून अधिक पाऊस कोसळला. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे हंगामी पावसाने इंचाचे अर्धशतक पार केले आहे. पावसामुळे दरडी कोसळण्याच्या आणि रस्ते पाण्याखाली जाण्याच्या घटना घडल्या.
वास्तविक शनिवारी फार पाऊस पडला नाही. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात केवळ २ इंचच पाऊस पडला. परंतु त्यानंतर पावसाने रौद्ररूप घेत राज्यातील जनजीवन विस्कळीत केले. कोने प्रियोळ येथे दरड कोसळण्याची दुर्घटना घडल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला. वाहतुक फर्मागुडी ते म्हार्दोळ तसेच पीईएस महाविद्यालय ते गोवा अभियांत्रिक महाविद्यालय या मार्गांनी वळविण्यात आली.
गुडी पारोडा येथील पूल पाण्याखाली गेल्यामुळे धोकादायक स्थिती बनली होती. वाहतूक पोलिसांनी दक्षता बाळगताना वेळीच त्या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळल्या. पावसाबरोबर सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे बिट् पिलानी जवळील वाहतूक बेराकेट्स उडून रस्त्यावर विखुरले गेले. वाहतुकदारांसाठी अत्यंत धोकादायक बनलेले हे बेरेकेट्स वाहतुक पोलिसांनी वेळीच हटविले. जुने गोवे व पिळर्णमध्ये जोरदारभारतीय हवामान खात्याच्या स्वयंचलीत यंत्रणेच्या नोंदीनुसार सकाळी ८.३० ते संध्याकाळी ३.३० पर्यंतच्या ७ तासात सर्वाधिक पाऊस हा जुने गोवे येथे ६.४१ इंच इतका पडला तर पिळर्ण येथे ५ इंच इतका कोसळला. काणकोण आणि मुरगावात २ इंचाहून अधिक पाऊस कोसळला. आजच्या पावसामुळे एकूण सरासरी पाऊस ५० इंच पार झाला आहे.