खाण घोटाळा प्रकरणातून दिगंबर कामत यांच्यासह तीन निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 11:02 PM2020-11-03T23:02:25+5:302020-11-03T23:03:59+5:30
हेदे खाण प्रकरण: आरोप निश्चिती एव्हढेही पुरावे नाहीत
मडगाव: ज्या प्रकरणामुळे गोव्यात राजकीय गहजब निर्माण झाला होता त्या डॉ. प्रफुल्ल हेदे खाण घोटाळा प्रकरणातून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यासह तिघांना खास न्यायाधीश एडगर फेर्नांडिस यांनी आरोप निश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त केले. या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीने खाण मालक डॉ. प्रफुल्ल हेदे, खाण खात्याचे अधिकारी ए. टी. डिसोझा आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते. मात्र या प्रकरणी आरोप निश्चिती करण्या एव्हढाही पुरावा अभियोग पक्ष न्यायालयासोर ठेवू न शकल्याने तिघांनाही कोर्टाकडून क्लिन चिट मिळाली.
या प्रकरणात एसआयटीने जे आरोपपत्र ठेवले होते त्याप्रमाणे डॉ. हेदे यांनी कुळे येथील खाणीतून 1998 ते 2007 पर्यंत बेकायदेशीर खनिज काढले. नंतर त्यांना कोंडोनेशन ऑफ डिले या व्याख्येखाली लीज कायदेशीर करून देण्यात आले. यासाठी त्यांना तत्कालीन खाण मंत्री दिगंबर कामत आणि खाण खात्याचे अधिकारी डिसोझा यांनी सहाय्य केले. यात भ्रष्टाचार झाल्याचा दावाही पोलिसांनी केला होता.
मात्र अभियोग पक्ष न्यायालयात यातील कुठलाही आरोप सिद्ध करू शकले नाहीत. या प्रकरणात ज्यावेळी आरोपपत्र दाखल करण्यात आले त्यावेळी काँग्रेसची सत्ता जाऊन भाजपची सत्ता आली. कामत यांच्यावर राजकीय सूड घेण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी हे प्रकरण त्यांच्यामागे लावल्याचा आरोप झाला होता.
"देव योग्य तो न्याय देतो, एव्हढेच मला म्हणायचे आहे. माझा देवावर व न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता. तो सार्थ ठरला. या प्रकरणात काहीच तथ्य नव्हते. मला त्यात विनाकारण गोवण्यात आले हे सर्वांनाच माहीत आहे"
दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते