पणजी : खाण अवलंबितांनी आंदोलनाच्या नावाखाली पणजीत येऊन महामार्ग रोखून धरून केलेल्या हिंसाचार व धुडगूस प्रकरणात पणजी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी पणजी पोलिसांनी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात 77 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.
पोलिसांनी दाखल केलेल्या या 350 पानी आरोपपत्रात 108 साक्षिदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या आहेत. आरोपपत्रात उल्लेख केलेल्या सर्व 77 आरोपींच्या गुन्ह्यांचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पुराव्यादाखल साक्षीदारांच्या साक्षी आहेतच. परंतु, वर्तमानपत्रावरील फोटो, ड्रोन वापरून पोलिसांनी केलेले आंदोलनकर्त्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग तसेच हॅण्डिकॅमद्वारे करण्यात आलेले रेकॉर्डिंगही पोलिसांकडे आहे. त्यामुळे आरोपपत्रात नमूद केलेले गुन्हे सिद्ध करणे सोपे जाणार असल्याचे पोलिसांना वाटते.
खाणी सुरू व्हाव्यात यासाठी खाण अवलंबितांनी 21 मार्च 2018 रोजी पणजीत भव्य मोर्चा काढला होता मोर्चेकऱ्यांनी म्हापसा पणजी महामार्ग व इतर रस्ते 4 तास रोखून धरले होते. मांडवीवरील दोन्ही पूल बंद केले होते. आंगोवनकर्त्यांनी सामान्य नागरिकांना वेठीस धरले तर होतेच. परंतु मारझोडही केली होती. त्यामुळे पोलिसांना लाठीमार करून जमाव पांगवावा लागला होता. अनेक आंदोलनकर्त्यांना अटकही करण्यात आली होती.