लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा: जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर अन्याय- अत्याचार करणाऱ्या शासकांची ही क्रूर परंपरा चालूच राहिली असती. शिवाजी महाराजांनंतर मोगलांना तोडीस तोड आव्हान देण्याचे काम बाजीराव पेशवे यांनी केले.
अटकेपार झेंडे लावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या योद्ध्यांच्या पराक्रमाला जागतिक दर्जा मिळायला पाहिजे होता; परंतु संकुचित वृत्तीच्या लोकांनी त्यांचा पराक्रम बाजूला ठेवून त्यांच्या जीवनात आलेल्या मस्तानीला अधोरेखित केले. कौटुंबिक कलहामुळे ४१ लढाया सतत जिंकलेला या पराक्रमी योद्ध्याला प्रसिद्धीपासून खूप लांब ठेवून त्याच्यावर अन्याय केला गेला, अशी खंत प्रसिद्ध अभिनेते व व्याख्याते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केली.
हिंदू संस्कृतीत 'न्यास' या संस्थेची फोंड्यात स्थापना झाली असून तिचा प्रारंभ शरद पोंक्षे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष जयंत मिरींगकर, सचिव मनोज गावकर, खजिनदार अजय सावईकर, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
बाजीराव पेशवे यांच्या शौर्यगाथेवर बोलताना शरद पोंक्षे पुढे म्हणाले, बाजीरावांवर लहानपणीच त्यांच्या आईने श्रीराम, श्रीकृष्ण व छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श बिंबवले. बाजीरावांनीसुद्धा या तीन महानायकांच्या जीवनाचा अभ्यास केला. जो त्यांना पुढे स्वराज्याची निर्मिती करताना कामी आला.
बाजीरावसुद्धा पंधरा वर्षे आणखी जगले असते तर आख्ख्या भारताचे हिंदवी स्वराज्य झाले असते. मोगलांकडे अफाट सैन्य होते; परंतु स्वतःकडे असलेल्या तुटपुंज्या सैनिकांच्या बळावर त्यांनी मोगलांना पळता भुई थोडी करून ठेवली होती. त्यांनी सैनिकांमध्ये विश्वास निर्माण केला होता.
कूटनीती राजकारण कसे करावे, हेसुद्धा त्यांच्याकडून शिकायला हवे. दिल्लीवर स्वारी करायची असेल तर या प्रवासादरम्यान येणाऱ्या प्रत्येक हिंदू राजांकडे समन्वय कसा साधावा, हे त्यांनी दाखवून दिले. म्हणूनच अवघे काही सैनिक व सामग्री घेऊन ते दिल्लीच्या तख्तापर्यंत जात होते व कामगिरी फत्ते करून येत होते, असेही पोंक्षे म्हणाले.