सुशांत कुंकळयेकर
मडगाव : गोव्यातील हिंदू आणि कॅथलिक यांच्यातील एकोप्याचे उत्तम उदाहरण म्हणून ज्या उत्सवाकडे पाहिले जाते तो श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणीचा छत्रोत्सव मंगळवारी मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. या उत्सवात हजारो हिंदू भाविकांबरोबरच कॅथलिक भाविकही तेवढय़ाच उत्साहाने सामील झाले होते. देवी आपल्या भेटीला आली या उमेदीने भाविकांनी एकामेकांना गुलाल लावून आपला आनंद व्यक्त केला.
मडगावपासून सुमारे 12 कि.मी. अंतरावर असलेल्या कुंकळ्ळीत दरवर्षी हिंदू व कॅथलिक भाविक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. पोतरुगीज काळात गोव्यात बाटाबाटीचे प्रकार झाले. त्यावेळी काही हिंदूंना कॅथलिक धर्मात धर्मातरित करण्यात आले. मात्र हे धर्मातरित आपले मुळ विसरले नाहीत. ज्या शांतादुर्गा देवीचा हा उत्सव आहे ती आपली मुळ देवी असल्याची भावना अजुनही कुंकळ्ळी गावातील कॅथोलिक लोकांमध्ये आहे. त्यामुळेच आपली देवी आपल्या भेटीला आली याच भावनेने हे कॅथोलिक लोक या उत्सवात तनमनाने सामील होतात.
असे सांगितले जाते की, सध्या कुंकळ्ळीपासून सहा कि.मी. अंतरावर असलेल्या फातर्पे गावात शांतादुर्गा कुंकळ्ळीकरिणीचे मंदीर आहे. या देवीचे मुळ मंदीर कुंकळ्ळीत होते. या देवीला भजणारे 12 वांगड (समुह) त्यावेळी होते. पोतरुगीजांनी बाटाबाटीच्यावेळी शांतादुर्गेचे कुंकळ्ळीतील मंदीर पाडून टाकले. त्यामुळे महाजनांनी ही देवी फातर्पेला हलवली. मात्र सध्या शिगम्याच्या काळात ही देवी वाजत गाजत बरोबर 12 रंगीबेरंगी छत्र्या घेऊन वर्षातून एकदा आपल्या मुळ स्थानी येते. यावेळी लोक एकमेकांवर गुलाल फेकून आपला आनंद व्यक्त करतात. या देवीला भजणा:या 12 वांगडातील काहीजणांचे कॅथोलिक धर्मात धर्मातर झाले. मात्र हे धर्मातरित कॅथोलिक लोक अजुनही देवीच्या छत्र्या नाचविण्यात धन्यता मानतात. एवढेच नव्हे तर हिंदू भाविकांच्या बरोबरीने तेवढय़ाच उत्साहात त्यात सामीलही होतात.
याच धर्मातरित वांगडय़ांपैकी एक असलेले गोव्याचे निवृत्त पोलीस अधिक्षक टोनी फर्नाडिस यांच्या घरी तर लोकांसाठी या उत्सवानिमित्त मेजवानी ठेवलेली असते. या अनोख्या उत्सवाबद्दल बोलताना फर्नाडिस यांनी सांगितले, आमचा जरी धर्म बदलला तरी अजुनही आम्ही आमची मुळे विसरलेलो नाहीत. आमची देवी आम्हाला भेटायला येते तेव्हा होणारा आनंद शब्दांतून व्यक्त करता येणो शक्य नाही. केवळ कुंकळ्ळीतच असे होणो शक्य आहे. मागची कित्येक वर्षे आम्ही ही आमची परंपरा अगदी प्राणपणाने सांभाळून ठेवली आहे असे ते म्हणाले.