लोकमत न्यूज नेटवर्क पणजी/फोंडा: 'एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतील इतिहास हा चुकीचा असून परकीय आक्रमकांचा उदोउदो करणारा आहे' अशी टीका योग गुरू रामदेव बाबा यांनी केली. आमचा इतिहास औरंगजेब व बाबराचा नाही तर शिवाजी महाराजांचा आहे,' असे ते म्हणाले.
शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना रामदेव बाबा म्हणाले की, 'चुकीचा इतिहास दुरुस्त करायला हवा. खराखुरा इतिहास शिकवायला हवा. मुघलांचे गोडवे गाणारा इतिहास आपल्याला नको आहे. आजवर चुकीचा इतिहास शिकवला गेला. इतिहासात मुघल राजकर्त्यांचा उदोउदो करताना खरे वीर बाजूला करण्यात आले. पुन्हा खराखुरा इतिहास नव्या पिढीसमोर यायला हवा.
औरंगजेब, अकबर हे खरे हिरो नसून छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप हेच आहेत, हा इतिहास शिकवला गेला पाहिजे. त्या शुरवीरांनी भारताच्या भविष्याबद्दल काही स्वप्ने बघितली होती, ती पूर्ण करण्यासाठी युवकांसमोर खरे आदर्श उभे करण्याची गरज आहे.'
रामदेव बाबा म्हणाले, 'आगामी काळ हा भारताचाच असेल. त्यासाठी नव्या पिढीने आव्हाने स्वीकारायला सुरुवात करायला हवी. मोठी स्वप्ने पाहायला हवीत. जर नव्या पिढीने ठरवले तर काही काळातच भारत जगातील एक मोठी शक्ती म्हणून नावारूपास येईल. आगामी १५ वर्षात देशाचे नेतृत्व करू शकेल, अशी प्रतिभासंपन्न युवा पिढी आमच्याकडे आहे.
'हिंदवी स्वराज्य हा भारताचा ध्यास आहे आणि शिवजयंतीच्या दिवशी जर आम्ही हिंदवी स्वराज्याची भाषा करणार नाही तर मग कधी करणार? असा सवालही रामदेव बाबा यांनी केला. 'सनातन हिंदू संस्कृतीचे गुणगान येणाऱ्या काळात अख्खे जग करणार आहे. परंतु त्यासाठीचे प्रयत्न सुरू व्हायला हवेत. त्यासाठी राष्ट्रवाद व अध्यात्म वाद निर्माण व्हायला हवा. शिवाजी महाराजांनी कधी जाती- पातींमध्ये भेद केला नाही. म्हणून ते आदर्श स्वराज्याची मुहूर्तमेढ रोव शकले. संपूर्ण भारताला एकतेच्या सूत्रात बांधण्यासाठीचा पहिला प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला होता. भारतात आतापर्यंत होऊन गेलेल्या आदर्शवादी राजांनी अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते, त्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची वेळ आली आहे.'
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"