पणजी : राज्यातील महिला सेल्फ हेल्प ग्रुप, कारागिरांना त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ‘स्वयंपूर्ण गोवा इ बाजार’चे काल दसय्राच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांहस्ते अनावरण करण्यात आले. १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ग्राहक या इ व्यासपीठावरुन वस्तू मागवू शकतात.
मुख्यमंत्री म्हणाले की, ‘ चवथ इ बाजार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने हे इ व्यासपीठ सुरु करण्यात आले आहे. पोर्टलवरुन व संकेतस्थळांवरुन वस्तू मागवता येतील. महिला सेल्फ हेल्प ग्रुपसह ग्रामीण भागातील सर्व कारागिरांना त्यांची उत्पादने या माध्यमातून विकता येतील. मुख्यमंत्री म्हणाले की, पहिल्या टप्प्यात २६ महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांना ॲप कसे वापरावा, एफडीएकडून परवाने कसे मिळवावेत वगैरे प्रशिक्षण दिले.
मुख्यमंत्री म्हणाले की,‘ केंद्राच्या विश्वकर्मा योजनेचा गोव्यात १८ वेगवेगळ्या प्रकारच्या व्यावसायिकांना फायदा होणार आहे. कोणत्याही हमीशिवाय प्रथम १ लाख रुपये ४ टक्के दराने अल्पव्याजी कर्ज व्यवसाय सुरु करण्यासाठी दिले जाईल. त्यानंतर २ लाख रुपये कर्ज दिले जाईल. शिंपी, सुतार, कुंभार एवढेच नव्हे तर ब्युटी पार्लर व्यावसायिकही याचा लाभ घेऊ शकतील. लोकांनी कॉमन सिटिझन सर्व्हीस सेंटरमध्ये जाऊन नोंदणी करावी.’
नियोजन व सांख्यिकी खात्याचे संचालक विजय सक्सेना यांनी ‘लोकमत’ला अधिक माहिती देताना सांगितले की,‘ किमान खराब न होता किमान सहा सात दिवस राहू शकतील अशा कोणत्याही वस्तू, हस्तकला वस्तू या माध्यमातून विकता येतील. उत्पादकाच्या मोबाइल फोनवर ॲार्डर जाईल व ४८ तासात माल घरपोच मिळेल.’ सक्सेना म्हणाले कि,‘ चवथ इ बाजार व त्यानंतर आताही गौतम गोविंद खरंगटे यांची या कामी खात्याला बरीच मदत झाली.’ कार्यक्रमाला मुख्य सचिव परिमल राय, आरडीएचे संचालक भूषण सावईकर व इतर अधिकारी उपस्थित होते.