- सुशांत कुंकळयेकरमडगाव: जगप्रसिद्ध काटरूनिस्ट मारियो मिरांडा यांच्या व्यंगचित्रांतून यापूर्वी गोव्यातील लोटली हे गाव जगाच्या कानाकोप-यात पोहोचले होते. आता हीच किमया लोटलीतील आणखी एक कलाकार असलेले महेंद्र आल्वारिस यांचे मिराबाईचे शिल्प करण्याची शक्यता आहे. भारतीय पोस्ट खात्याने हे शिल्प पिक्टोरियल कॅन्सेलेशन (टपालाचा शिक्का) म्हणून स्वीकारलेले असून गोव्यात कुठल्याही वस्तूला पहिल्यांदाच टपालाचा शिक्का बनण्याचा मान मिळाला आहे.मडगावपासून दहा किमी अंतरावर असलेल्या लोटली येथील बीग फूट प्रकल्पात हे 14 मीटर ७5 मीटर आकाराचे संपूर्ण एका जांभ्या दगडात कोरलेल्या या शिल्पाला यापूर्वीच लिम्का बुक ऑफ रिकॉर्डसह सहा विक्रमांच्या पुस्तकात स्थान मिळालेले आहे. अवघ्या 30 दिवसांत पूर्ण केल्या गेलेल्या या शिल्पाला या पूर्वी जांभ्या दगडात बनविलेले देशातील सर्वात मोठे आणि सर्वात जलद बनविलेले शिल्प म्हणून विक्रमाच्या पुस्तकात स्थान प्राप्त झाले आहे. बिग फूटचे प्रवर्तक महेंद्र आल्वारिस यांनी 1994 साली हे शिल्प बनविले होते. पुढच्या वर्षी या घटनेला 25 वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्वभूमीवर या शिल्पाला पोस्टाकडून मिळालेला मान आमच्यासाठी खचितच अभिमानाची गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया आल्वारिस यांनी व्यक्त केली.लोटलीतील बिग फूट प्रकल्पासाठी पोस्टाने खास लेटर बॉक्स तयार केले असून या लेटर बॉक्समध्ये पोस्ट केल्या जाणा-या प्रत्येक पत्रवर आता हा संत मिराबाईचा शिक्का उमटविला जाणार आहे. यापुढे हा शिक्का लोटली पोस्टातही वापरला जाण्याची शक्यता आहे. या शिल्पाचे चित्र स्वत: आल्वारिस यांनीच रेखाटले होते. तेच चित्र पोस्ट खात्याने आता टपालाचा शिक्का म्हणून उपयोगात आणायचे ठरविले आहे. यापूर्वी याच शिल्पाला पोस्ट कार्डाचा मान मिळाला होता. केवळ 30 दिवसांत आल्वारिस यांनी एक हाती हे शिल्प पूर्ण केले होते.या शिल्पानंतरच बिग फूटचे नाव सगळीकडे झाले होते. त्यानंतर आल्वारिस यांनी याच प्रकल्पात जुन्या काळातील गोव्याचे जीवन पुतळ्याच्या रुपात पर्यटकांसाठी तयार केले होते. याच प्रकल्पात आशियातील एकमेव असा डावखु-यांचे संग्रहालय असून त्यात महात्मा गांधीपासून, सचिन तेंडुलकर यांच्यार्पयत डावखु-यांचे पुतळे ठेवण्यात आले आहेत. सध्या या प्रकल्पात डावखु-यांच्या हाताचे ठसे एकत्रित करण्याची मोहीमही चालू असून येते संपूर्ण वर्ष हा उपक्रम चालू राहणार आहे. 125व्या गांधी जयंती निमित्त हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहिती आल्वारिस यांनी दिली.
लोटलीतील संत मिराबाईच्या शिल्पाला टपालाच्या शिक्क्याचा मान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 6:17 PM