मडगाव - खारेबांद-मडगाव येथील नैमुनिस्सा नारंगी मृत्यू प्रकरणात हॉस्पिसियो रुग्णालयाच्या डॉक्टरांचा कुठलाही हलगर्जीपणा कारणीभूत नाही. या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी समितीने हे नमूद करुन आपला अहवाल आरोग्य खात्याला पाठवून दिला. यामुळे हॉस्पिसियोच्या डॉक्टरांवर आलेला आळ नाहीसा झाला आहे. सदर महिलेला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आल्याचे या अहवालात म्हटले आहे.
हॉस्पिसियोच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, नैमुनिस्साचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला होता. या आरोपाची चौकशी करण्यासाठी तीन डॉक्टरांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातून जानुजो गोन्साल्वीस या युवकाचा मृतदेह गायब झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने आरोग्य खाते अडचणीत आले होते. विरोधी काँग्रेस पक्षानेही हा विषय ताणून धरला होता.
महिला मडगाव रेल्वे स्टेशनावर गेली असता तिचा पाय घसरुन खाली पडल्याने तिचा हात मोडला होता. त्यानंतर तिला हॉस्पिसियोत दाखल केले होते. हॉस्पिसियोत तिच्या हातावर शस्त्रक्रिया केली होती. मात्र अकस्मात तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने तिला गोमेकॉत हलविण्यात आले होते. तिथे तीन दिवस तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले होते. हे उपचार चालू असतानाच तिचा मृत्यू झाला. शस्त्रक्रिया करताना भुलीचे औषध जास्त प्रमाणात दिल्याने तिला मृत्यू आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर महिलेची शस्त्रक्रिया केल्यानंतर तिला हृदय संदर्भातील व्याधी सुरु झाल्याने तिला गोमेकॉत हलविण्यात आले होते. त्यावर उपचार चालू असतानाच तिचे निधन झाले अशी माहिती हॉस्पिसियोच्या सुत्रांनी दिली.