वास्को: आज (दि. ११) रात्री ७.३० वाजता बायणा, वास्को येथे असलेल्या अहमद शेख याच्या घराला भयंकर अशी आग लागल्याने घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले असून ह्या घटनेत घरमालकाला सात लाखाहून जास्त रुपयांची नुकसानी झाल्याचा अंदाज आहे. ह्या घरात लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी वास्को अग्निशामक दलासहीत, गोवा शिपयार्ड, झुआरी एग्रो कॅमिकल्स व एम.पी.टी अशा चार बंबांना घटनास्थळावर दाखल व्हावे लागले असून अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण आणण्यास त्यांना यश प्राप्त झाले.
बायणा येथे राहणाऱ्या अहमद शेख याच्या घरातील सर्व सदस्य बाहेर असताना ही घटना घडल्याने सुदैवाने जीवीतहानी टळली. अहमद याची पत्नी चांदवी तिच्या दहावी इयत्तेत शिकणाºया मुलीला शिकवणीसाठी शिक्षीकेच्या घरी घेऊन जात असताना तिचा पाचवी इयत्तेत शिकणारा मुलगा घराबाहेर मित्राबरोबर खेळत होता. यावेळी घर बंद असून अचानाक घरातून आगीचे लोण येण्यास सुरू झाल्याचे जवळपास राहणाºया नागरीकांच्या नजरेस येताच त्यांनी त्वरित याबाबत अग्निशामक दलाला माहीती दिली. ही आग काही मिनिटातच संपूर्ण घरात पसरून भयंकर अशा लागलेल्या ह्या आगीवर नियंत्रण आणण्यास वास्को अग्निशामक दलाच्या जवानांना कठीण ठरत असल्याने नंतर त्वरित अन्य तीन अग्निशामक दलाच्या बंबांनी व जवानांनी घटनास्थळावर पाचारण केले. आगीचा भडका एवढा भयंकर होता की घराचे छप्पर जळून खाक झाले. घर बंद असल्याने आगीवर नियंत्रण आणण्यास सुरवातीला जवानांना बराच त्रास सोसावा लागला. यानंतर घराचा दरवाजा तोडून तसेच जळून खाक झालेल्या छप्पराच्या आतून पाण्याचे फव्वारे मारण्यास सुरू करून अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर येथे लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यास अग्निशामक दलाला यश प्राप्त झाले. ह्या घर मालकाची पत्नी चांदवी यांनी आपल्या घरात सोन्याचे ऐवज, ३५ हजार रुपयांची रोख रक्कम तसेच इतर विविध सामग्री असल्याचे सांगून सात लाखाहून अधिक रुपयांची मालमत्ता जळून खाक झाल्याचे सांगितले. ह्या आगीच्या घटनेत घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाल्याची माहीती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी देऊन सदर घर सुद्धा एकंदरीत पूर्ण जळून खाक झाल्याचे सांगितले. ह्या घटनेमुळे अहमद शेख यांच्या कुटूंबियावर संकटाचा डोंगर कोसळण्याची परिस्थिती आली आहे.
या घराला टेकून अन्य बरीच घरे असून बाजूच्या एक - दोन घरांनाही आगीची झळ बसलेली असल्याची माहीती अग्निशामक दलाच्या सूत्रांनी दिली. आग लागण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सरकीटमुळे ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशामक दलाच्या अधिकाºयांनी अथक प्रयत्न घेऊन रात्री १० च्या सुमारास आगीवर नियंत्रण आणून बाजूच्या इतर घरांना निर्माण झालेला धोका दूर केला. आग विझवण्यात आली असली तरी अग्निशामक दलाचे जवान उशिरा रात्री पर्यंत पुन्हा काही अनुचित घटना घडणार नाही याची खात्री करून घेण्यासाठी उपस्थित असल्याचे दिसून आले.
आपल्या मुलीला शिक्षीकेच्या घरी शिकवणीसाठी सोडण्यासाठी जात असताना चांदवी रात्रीचा वेळ झाल्याने आपल्या पाचवीय असलेल्या मुलाला घरात बंद करून जाणार होती, मात्र आपण आपल्या मित्राबरोबर खेळण्याचा हट्ट त्यांने केल्याने तिने त्याला खेळण्यासाठी घराबाहेर पाठवून ती मुलीला शिक्षीकेच्या घरी घेऊन गेली. सुदैवाने आपल्या मुलाला खेळण्यासाठी तिने बाहेर पाठवल्याने येथे होणार असलेला मोठा अनर्थ टळला