पणजी: गोवा मुक्त होऊन ६० वर्ष झाली तरी अजूनही भाटकारांच्या जागेतील घरे मुंडकारांच्या नावे झालेली नाहीत. त्यामुळे कुळ मुंडकार कायद्या अंतर्गत प्रलंबित असलेली मुंडकारी खटले गतीने निकाली काढून भाटकाराच्या जागेतील ३०० चौरस मीटर जमिनीतील घरे नियमित केली जातील असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
स्वयंपूर्ण गोवा कार्यक्रमात स्वयंपूर्ण मित्रांसोबत साधलेल्या ऑनलाईन संवादावेळी ते बोलत होते. कुळमुंडकार कायद्या अंतर्गत उत्तर गोव्यात २ हजार तर दक्षिण गोव्यात दीड हजार प्रकरणे प्रलंबित आहे. या प्रकरणांवर लवकर सुनावणी घेऊन ते निकाली काढावेत असे मामलेदार तसेच उपजिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला आहे. यासाठी शनिवारी सुध्दा मामलेदार न्यायालयने सुरु रहावीत असे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले, की भाटकारांच्या जागेतील घरे नियमित करण्यासाठी काही निकष ठरवले आहेत. यात सदर घरे ही १९७० वर्षापूर्वीची असावीत, एक चौदाचा उतारा किंवा अन्य काही दाखला, वीज किंवा पाण्याचे बिल किंवा मतदार यादीत घर क्रमांकाचा उल्लेख असायला पाहिजे. सर्व निकषांचे पालन झाल्यास भाटकाराच्या जागतेल ३०० मीटर जमिनीतील मुंडकाराचे घरे नियमित केले जाईल. त्यानंतर त्यांना सनद प्राप्त होईल त्यांनी सांगितले.