पणजी - आम आदमी पार्टीचे निमंत्रक एल्वीस गोम्स यांना गृहर्निाण घोटाळा प्रकरणातून मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने निर्दोष घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारचे पुरावे नसल्यामुळे त्यांच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाणार नाही. सासस्टी तालुक्यात गृहनिर्माणासाठी जमीन संपादीत करण्याची प्रक्रिया सुरू करून नंतर ती प्रक्रिया रद्द करण्याच्या प्रकरणात भ्रष्टाचार विरोधी विभागाकडून एलव्हीस गोम्स व इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात गोम्स यांची एसीबीकडून चौकशीही करण्यात आली होती. या प्रकरणात नोंद करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा यासाठी गोम्स यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी झाली तेव्हा या प्रकरणातील तपास अहवाल सादर करण्याचा आदेश खंडपीठाने दिला. गोम्स यांच्या विरुद्ध कोणतेही ठोस पुरावे तापस अहवालात दाखविता आले नसल्यामुळे महेश सोनक व नूतन सरदेसाई यांच्या खंडपीठाने याचिकादाराच्या बाजूने कौल देताना त्यांना निर्दोष ठरविणारा निवाडा दिला. त्यांच्या विरुद्धचा गुन्हा रद्दबातल ठरविण्यात आला. लोकसभा निवडणुकीसाठी दक्षीण गोव्यातून निवडणूक लढविण्याची घोषणा केलेले गोम्स यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आपल्याला न्याय दिल्या बद्दल त्यांनी न्यायालयाचे आभारही मानले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपल्याविरुद्ध नोंदविण्यात आलेला गुन्हा हा राजकीय स्वरूपाचा होता असे सांगितले. गृहनिर्माण महामंडळाने इतर ठिकाणी संपादन करण्यासाठी घेतलेल्या जमिनीची माहितीही आपण सरकारला दिली होती व त्यावर कारवाई करण्याचे आव्हान दिले होते. परंतु आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर कारवाई करावी लागेल म्हणून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोपही त्यांनी केला.
गृहनिर्माण घोटाळा: गोवा ‘आपचे प्रमुख निर्दोष, खंडपीठाचा निवाडा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 10:22 PM