पणजी : सरकार पुढील काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने गृहनिर्माण योजना तयार करील. या योजनेचा लाभ समाजाचे सर्वच घटक घेऊ शकतील. सगळेच घटक एकाच वसाहतीत निवास करू शकतील, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गुरुवारी येथे झालेल्या आंबेडकर जयंतीच्या मुख्य कार्यक्रमावेळी जाहीर केले. मुख्यमंत्री म्हणाले की, अनुसूचित जमातींसाठी ज्या योजना सरकारने यापूर्वी आखल्या त्या योजनांचा लाभ आता अनुसूचित जातींच्या लोकांनाही दिला जात आहे. एकूण २१ योजना या वर्षापासून आम्ही अनुसूचित जातींना लागू करून त्यासाठी अर्र्थसंकल्पात पुरेशी आर्थिक तरतूदही केली आहे. आतापर्यंत समाजाच्या ज्या वर्गास योजनांचा लाभ मिळाला नाही, त्यांना तो मिळावा असा त्यामागे आमचा हेतू आहे. राज्यात राज्यस्तरीय असे आंबेडकर भवन उभे राहावे, अशा प्रकारची मागणीही येत आहे. तालुका स्तरावरही आंबेडकर भवनांची व्यवस्था करता येईल, अशा प्रकारच्या तरतुदी यापूर्वी अनुसूचित जमात कल्याण निधीतून सरकारने केल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, सध्या राज्यातील ३४-३५ ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जातींसाठी प्रभाग आरक्षित आहेत. राज्यातील अन्य ज्या ज्या पंचायत क्षेत्रात अनुसूचित जातींची लोकसंख्या असेल त्या सर्व पंचायतींमध्ये येत्या पंचायत निवडणुकीपूर्वी सरकार अनुसूचित जातींसाठी आरक्षणाची व्यवस्था करील. समाज कल्याण खात्यातर्फे येथे आयोजित या सोहळ्यावेळी वनमंत्री राजेंद्र आर्लेकर, समाज कल्याण मंत्री महादेव नाईक, उपसभापती विष्णू वाघ, उच्च शिक्षण खात्याचे संचालक भास्कर नायक आदी व्यासपीठावर होते. भास्कर नायक आपल्या भाषणावेळी म्हणाले की, गांधी व आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद होते; पण आंबेडकरांचे महत्त्व गांधीजींनी ओळखले होते. म्हणूनच घटना लिहायचे काम गांधीजींनीच आंबेडकरांकडे सोपविले. या वेळी रमेश कुलकर्णी, गंगाराम मोरजकर, सखाराम कोरगावकर, गणेश पवार यांचा सत्कार करण्यात आला. (खास प्रतिनिधी)
आंबेडकरांच्या नावे गृहनिर्माण योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2016 2:09 AM