किशोर कुबल
पणजी : तेलंगणात बंगळुरू हायवेवर गोवा बनावटीची तब्बल २ कोटी रुपये किमतीची दारु पकडली गेल्याने आपचे गोवा प्रमुख अॅड. अमित पालेकर यानी एवढ्या मोठ्या प्रमाणात गोव्याच्या हद्दीवरुन दारु निसटलीच कशी? असा प्रश्न उपस्थित केला आहे. पालेकर यांनी असा सवाल केला आहे की, ‘राज्य सरकारला या दारु तस्करीची काहीच माहिती कशी काय मिळाली नाही? मुख्यमंत्र्यांच्या अधिपत्याखालील अबकारी खाते निष्क्रीय आहे का? की अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांशी हातमिळवणी आहे?
अंमलबजावणी यंत्रणांनी शुक्रवारी रात्री तेलंगणातील बालानगर आणि जडचेर्ला दरम्यानच्या बंगळुरू महामार्गावर गोव्यातून तस्करी केलेली तब्बल दोन कोटी रुपये किमतीची अवैध दारु जप्त करुन दोघांना ताब्यात जप्त केली होती. लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून केलेल्या दारु जप्तीपैकी ही एक मोठी जप्ती आहे. एका ट्रकमधून आंध्र प्रदेशात ती पोहोचवली जाणार होती.
वाहनासह जप्त केलेल्या बाटल्या पुढील तपासासाठी तेलंगणा दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत.