पणजी (गोवा) : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) गोव्यात आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेलचा पर्दाफाश करताना रशियन ऑलिम्पीकपटूसह तिघांना अटक करून ३० लाखांचा ड्रग्स जप्त केल्यामुळे गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्न उभे राहिले आहे. या इतक्या मोठ्या ड्रग्स रेकेटची एएनसीला भनकही का लागली नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
एनसीबीकडून शनिवारी करण्यात आलेली हरमल येथील कारवाई ही गाजली आहे. या कारवाईत एनसीबीकडून श्वेतलाना वर्गानोव्हा या रशियन महिला ऑलम्पिकपटुला अटक केली होती. तिने १९८० मधील ऑल्म्पिकमध्ये जलतरण या क्रीडा प्रकारात रौप्य पदक मिळविले होते.
हरमल येथे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहेत. या छाप्यात दोन रशियन लोकांना अटक करण्यात आली आहे त्यापैकी एक रशियन ऑलम्पिकपटु महिलेचाही समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या ३० लाख रुपये किंमतीच्या ड्रग्समध्ये ८८ एलएसडी ब्लॉट्स, ८.८ग्रॅम कोकेन, २४२.५ ग्रॅम चरस, १.४४० किलो हायड्रोपोनिक विड, १६.४९ ग्रॅम हॅश ऑइल, ४१० ग्रॅम हॅश केक अशा प्रकारचे पदार्थ जप्त करण्यात आले. या पैकी हॅश, हॅश केक, हायड्रोपोनिक विड या सारखे अंमली पदार्थ गोव्यात वापरात आहेत याची कल्पनाही एएनसीला नसावी. कारण अशा प्रकारचे पदार्थ कधी जप्त करण्यात आल्याचे ऐकिवात नाही.
मुळापर्यंत न पोहोचल्याने ३० लाख रुपयांचा ड्रग्स साठा जप्त करण्याची जी कारवाई एनसीबीकडून करण्यात आली ती एनसीबीला मिळालेल्या एका गुप्त माहिती मुळेच शक्य झाली. या पूर्वी एनसीबीकडून गोव्यातच ड्रग्स प्रकरणात एका रशियन नागरिकाला पकडण्यात आले होते. या रशियनकडून ड्रग्स व्यवहाराबाबतची सखोल माहिती वदवून घेण्यास एनसीबीला यश मिळाले. त्या आधारावरच ही कारवाई करण्यात आली. गोवा एएनसीकडून या पूर्वी अनेक रशियनना ड्रग्स प्रकरणात पकडण्यात आले आहे. परंतु पकडण्यात आलेल्या व्यक्तीकडून या व्यवहारांची पाळेमुळे शोधून काढण्यास कधी यश आले नाही.
आकाशचे साथिदार कोण?एनसीबीकडून अटक करण्यात आलेला आकाश याच्या देखरेखीखाली रशियाहून गोव्यात ड्रग्स व्यवहार होत होते. एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण ड्रग्स नेटवर्कच तो सांभाळत होता. तसेच त्याच्या खाली काम करणारी आणखी काही मंडळी आहे आणि एनसीबी पथकाकडून त्यांचा शोध घेणे सुरू आहे.