पणजी : वीज दरवाढीच्या विषयावरून वीज मंत्री पांडुरंग मडकईकर व आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांच्यात काही दिवसांपूर्वी शीतयुद्ध रंगले व दोन्ही भाजप नेत्यांमध्ये कटुता निर्माण झाली. मात्र गुरुवारी रात्री बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या एका कौटुंबिक सोहळ्यावेळी मडकईकर व विश्वजित यांच्यात दिलजमाई घडून आली. अनेक मंत्री व आमदारांच्या साक्षीने या दोन्ही नेत्यांनी एकमेकांना अलिंगनही दिले.राजकारणात अनेकदा चित्र जे लोकांना दिसत असते, तसे ते असत नाही. दोन नेते एकमेकांचे कट्टर शत्रू बनल्याचे चित्र बाहेर दिसत असले तरी, प्रत्यक्षात स्थिती तशी असतेच असे नाही. राज्यातील वीजेच्या दरात गेल्या आठवड्यात मोठी वाढ झाली. त्यामुळे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषद घेतली व वीज दरवाढीच्या विषयावरून टीका केली. जर दरवाढ मागे घेतली नाही तर आपण पणजीत दहा हजार लोकांना घेऊन मेणबत्ती मोर्चा काढू,असा इशाराही मंत्री राणो यांनी दिला. त्यानंतर लगेच मंत्री मडकईकर यांनी राणे यांना प्रत्युत्तर दिले. वीज दरवाढीच्या विषयावर मंत्रिमंडळ बैठकीतच चर्चा झाली होती व त्या बैठकीला विश्वजित हे अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे त्यांना विषयाचा अभ्यासच नाही, असे मडकईकर म्हणाले होते. या दोन्ही नेत्यांमधील या शीतयुद्धाची दखल भाजपच्या कोअर टीमनेही घेतली होती. मडकईकर यांनी नंतर घरगुती वापरासाठीच्या वीजेच्या दरातील वाढ घेण्याचीही घोषणा केली.
मंत्री मडकईकर व राणे हे एकमेकांशी बोलत नव्हते. मडकईकर यांच्या घर प्रवेश सोहळ्य़ालाही विश्वजित राणे उपस्थित राहिले नव्हते. पण प्रथमच त्यांची मंत्री ढवळीकर यांच्या कौटुंबिक सोहळ्य़ावेळी एकमेकांशी भेट झाली. त्या सोहळ्य़ावेळी अनेक मंत्री, आमदार, माजी आमदार उपस्थित होते. मंत्री विश्वजित यांनी या सोहळ्य़ावेळी प्रथम मडकईकर याना मिठी मारली. वीज दरवाढ मागे घेण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो असे मंत्री राणो म्हणाले. मडकईकर व राण यांच्या नंतर बराचवेळ गप्पा झाल्या. ही भेट फोटोमध्ये बंदिस्त करून ठेवूया असेही काही मंत्री यावेळी विनोदाने म्हणाले.