नरेश डोंगरे / आशिष रॉयपणजी (गोवा) : कॅसिनोवर रोज कोट्यवधींची उलाढाल होते. यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात काळ्या धनाची हेरफेरही होत असल्याची शंका आहे. त्याचा हिशेब कुणाला दिला जातो किंवा कोणाला सांगितला जातो, ते कळायला मार्ग नाही. हा हिशेब तपासला तर तपास यंत्रणांच्याही भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत, असे गोवा-पणजीकर म्हणतात.
कॅसिनो माफियांच्या उलाढालीकडे अनेकजण सूक्ष्म नजर ठेवून आहेत. सहज शहानिशा केल्यास ‘बात मे दम है’, असेही लक्षात येते. त्यानुसार, एका कॅसिनोवर रोज किमान पाचशे ते सातशे लोक जातात. एका व्यक्तीच्या प्रवेशासाठी कॅसिनो संचालकाच्या मर्जीप्रमाणे दोन हजारांपासून साडेतीन हजारांपर्यंतची रक्कम उकळली जाते. (यात खाणे, पिणे आणि नाचगाणे सर्वच उपलब्ध असल्याचे ग्राहकाला सांगितले जाते.) एन्ट्री फीच्या नावाखाली त्या कॅसिनो चालकाच्या गल्ल्यात सरासरी पंधरा लाख रुपये जमा होतात. सहा कॅसिनो संचालकांची गोळा बेरीज केली तर दरदिवसाची ही रोकड ९० लाख रुपयांवर पोहोचत, असा अंदाज आहे.
सातारा लुटले, पुण्यात सोडलेसातारा लुटले आणि पुण्यात सोडले, अशी एक जुनी म्हण आहे. ती गोव्याच्या कॅसिनोतून गोळा केलेल्या रकमेच्या बाबतीत खरी ठरावी. गोव्यातील प्रचंड उलाढाल कुठे जाते, त्याबाबत उलटसुलट चर्चा आहे. ही एवढी प्रचंड रक्कम गोव्यातून दिल्ली, मुंबई, गुजरात आणि हरयाणात पोहोचते, अशीही चर्चा आहे. या संबंधाने वेगवेगळ्या प्रांतांतील काही वजनदार नावेही घेतली जातात. महिन्याला या शंभर कोटींचा हिशेब कोण ठेवतो, सरकारला किंवा अन्य सरकारी यंत्रणांना तो टॅक्सच्या रूपात किती दिला जातो, हा स्वतंत्र तपासाचा विषय ठरावा.
महिनाभरात शंभर कोटींहून अधिक रकमेची उलाढाल एका रात्रीत एंट्री फीच्या नावाखाली कॅसिनो संचालकांकडे ९० लाख रुपये गोळा होतात. या ६०० पैकी २०० जण जुगार खेळत असावेत, असे गृहीत धरल्यास आणि प्रत्येकाची जुगाराची रोकड फक्त वीस हजार रुपये धरली तर चाळीस लाख रुपये जुगाराची उलाढाल होते. एन्ट्री फी आणि जुगाराची उलाढाल प्रत्येक रात्री साडेतीन कोटी रुपयांच्या घरात पोहोचते. महिनाभरात कॅसिनो लॉबी शंभर कोटी रुपयांपेक्षाही जास्त उलाढाल करते.