सद्गुरू पाटील, निवासी संपादक, गोवा
लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती यायला आता अवघे आठ-दहा दिवस उरले आहेत. कौन कितने पानी में.. हे लवकरच कळेल. संघटन कौशल्याच्या बळावर भाजप 'अब की बार चार सौ पार' म्हणत आहे, तर इंडिया काँग्रेस आघाडी मोदींचा पराभव होईल, असा दावा करते. घोडा मैदान जवळच आहे, बघूया काय होतंय !
राष्ट्रीय कीर्तीचे विश्लेषक प्रशांत किशोर यांना मी गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी दोनदा भेटलो होतो. त्यांची राजकीय भूमिका समजून घेणे व देशभरातील राजकारणाचे त्यांना किती आकलन आहे, हेही जाणून घेणे असा हेतू होता. अर्थात त्यावेळी ते तृणमूल काँग्रेसला मार्गदर्शन करत होते. आता तर त्यांनी स्वतःचाच एक वेगळा पक्ष काढलाय व ते बिहारमध्ये जास्त काम करतात, ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांनी दोन दिवसांपूर्वीच प्रशांत किशोर यांची मुलाखत घेतलीय. त्याबाबतचा व्हिडीओ उपलब्ध आहे.
प्रशांत किशोर यांनी गेले तीन महिने एकच भूमिका सातत्याने मांडली आहे. ती अशी की- लोक काहीही बोलोत पण मोदी सरकार पुन्हा केंद्रात सत्तेवर येत आहे आणि भाजप यावेळी तीनशेहून अधिक जागा प्राप्त करत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजप जेवढ्या जागा जिंकला होता, त्याहून अधिक जागा यावेळी जिंकेल, असे प्रशांत किशोर सांगतात, अर्थात प्रशांत किशोर यांचा दावा काहीजणांना एकतर्फी वाटतोय पण त्या दाव्याकडे दुर्लक्ष करता येत नाही हे येथे नमूद करावे लागेल. त्या दाव्याच्या अनुषंगाने चर्चा घडवून आणणे हे या लेखाचे प्रयोजन आहे. प्रशांत किशोर यांना भाजपच्या बाजूने बोलायला भाजपच्याच नेत्यांनी सांगितलेय हा विरोधी पक्षातील काही नेत्यांचा दावा मला पटत नाही. कारण प्रशांत किशोर बोलले म्हणजे काही भाजपची मते वाढतील असे नाही, पण त्यांचा राजकीय अभ्यास पाहता त्यांचा दावा महत्वाचा आहे.
योगेंद्र यादव यांनी भाजप यावेळी हरतोय व प्रत्येक राज्यात भाजपच्या जागा यावेळी कमी होतील, अशी मांडणी केली आहे. सेफोलॉजिस्ट योगेंद्र यादव हे देखील खूप अभ्यास करणाऱ्यांपैकी आहेत. मात्र त्यांचा दावा पूर्णपणे पटत नाही, कारण भाजप यावेळी दक्षिण भारतात थोड्या जागा जिंकतोय असे अनेकजण मान्य करतात. गेल्यावेळी १३० पैकी फक्त २९ जागा भाजप दक्षिण भारतात जिंकला होता, यावेळी जास्त जिंकेल अशी माहिती मिळते. उत्तर भारतात समजा पन्नास जागा भाजप हरला तरी, अन्य ठिकाणी भाजपला अधिक जागा मिळतील व त्यामुळे ते पन्नास जागांची नुकसानी भरून काढतील, अशी मांडणी काही विश्लेषक करतात.
प्रशांत किशोर यांचाही दावा त्याच पद्धतीचा आहे. एक मान्य करायला हवे की 'अब की बार चारसौ पार' असा दावा करून मोदी यांनी विरोधकांमध्ये गोंधळ उडवून दिला. विरोधकांनी सुरुवातीला भाजप हरतोय किंवा मोदी पराभूत होतात असा दावा केलाच नाही, फक्त चारशे जागा जिंकणार नाहीत असाच दावा केला. म्हणजे भाजप जिंकतोय पण चारशे जागा मिळणार नाहीत, असे काही टीकाकार बोलत राहिले.
दुसरी गोष्ट अशी की इंडिया आधाडी स्थापन करण्याबाबत विरोधकांनी खूप विलंब केला. तशात मोदी सरकारने नेमके निवडणुकीवेळीच आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना जायबंदी केले. केजरीवाल यांचा बहुतांश वेळ इडीविरुद्ध न्यायालयात लढण्यात आणि तुरुंगात गेला, केजरीवाल प्रचारासाठी शेवटी तुरुंगातून बाहेर आले, त्यांनी काही सनसनाटी विधाने करत विरोधकांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्नही केला, मात्र इंडिया आघाडीचे प्रत्यक्ष काम ग्राउंडवर नाही हे मान्य करावे लागेल, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे किंवा नेत्यांचे काम हे प्रत्यक्ष फिल्डवर जास्त नाहीच. त्यांचे काम प्रसार माध्यमांमधून नेहमी हल्लाबोल करण्यावरच केंद्रीत झालेले आहे.
गोव्यातही पूर्णपणे तोच अनुभव येतो. फक्त पत्रकार परिषद घेणे किंवा मीडियामधून आसूड ओढत राहणे हेच त्यांनी गोव्यातही केले आहे. प्रत्यक्ष फिल्डवर दिवसरात्र काम करण्याचे कौशल्य काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते हरवून बसले आहेत. अरविंद केजरीवाल जर तुरुंगात गेले नसते तर त्यांनी आपची आणखी बरीच शक्ती पूर्णपणे भाजपविरुद्ध प्रचारासाठी वापरली असती, पण ते अडकले, त्यामुळे इंडिया आघाडीचे थोडे बळ कमी झाले. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी व निकालासाठी फक्त आठ दिवसांचा कालावधी बाकी आहे. ४ जून रोजी कळेलच, कुणाचे अंदाज बरोबर व कुणाचे चुकले. उत्तर व पश्चिम भारतात भाजप खूप मजबूत आहे, पण यावेळी उत्तर प्रदेशातही भाजप काही जागा गमावतोय असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
बिहारमध्ये तसेच दक्षिण भारतात कर्नाटकमध्येही भाजपच्या जागा कमी होतील. महाराष्ट्रात तर चिंतेचीच स्थिती आहे. मात्र ही सगळी हानी क्षणभर युक्तिवादासाठी मान्य केली आणि भाजपने पूर्ण देशात एकूण ५० जागा गमावल्या तरी, नव्या ५० जागा भाजप जिंकणार आहे, असे सांगणारे राजकीय विश्लेषकही देशात आहेतच. प्रशांत किशोर तर म्हणतात की- सुमारे २५० आगा भाजपला गेल्यावेळी उत्तर व पश्चिम भारतातून मिळाल्या होत्या, पश्चिम बंगाल, ओडीशा, आसाम, आंध्रप्रदेश आदी राज्यांमध्ये यावेळी भाजपची मते व जागा थोड्या वाढणार आहेत. त्यामुळे उत्तरेत पन्नास जागा कमी झाल्या तरी, अन्यत्र पन्नास जागा वाढू शकतात. समजा राजस्थान, हरयाना अशा ठिकाणी दोन-तीन जागा भाजपने गमावल्या तरी पश्चिम बंगालमध्ये यावेळी भाजपची मते व जागा वाढू शकतील.
यूपी व बिहारमध्ये २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये भाजप लोकसभेच्या २५ जागा हरला होता. म्हणजे २०१४ साली ज्या जागा भाजप यूपी व बिहारमध्ये मिळून जिंकला होता, त्यापैकी पंचवीस जागा मोदींचा भाजप हरला होता. तरी देखील भाजपची २०१९ मध्ये हानी झाली नाही, उलट देशभर जास्तच जागा जिंकून भाजप २०१९ मध्ये मजबूत झाला. यावेळीही पश्चिम बंगाल, आसाम, ओडीशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश अशा ठिकाणी 'भाजपच्या जागा वाढतील, असा विश्लेषकांचा दावा आहे. प्रशांत किशोर तर म्हणतात की सांगता येत नाही पण केरळ व तमिळनाडूतील एक-दोन जागाही यावेळी भाजप प्राप्त करू शकतो.
अर्थात हा केवळ अंदाज आहे. त्याला अनुभवाची जोड आहे. काँग्रेसला स्वतःला तीन आकडी आगा, म्हणजे शंभर जागाही जिंकता येणार नाहीत असे किशोर म्हणतात. हा देखील अंदाजच आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, दिल्ली अशा काही राज्यांतून आपल्याला यावेळी जास्त जागा मिळतील, असे इंडिया आघाडीला वाटते. शिवाय भाजपची मतांची टक्केवारी यावेळी कमी होईल, असे इंडिया आघाडीच्या नेत्यांना वाटते. मात्र हे सगळे अंदाजच आहेत. प्रशांत किशोर म्हणता ते खरे की- योगेंद्र यादव यांचा हिशेब खरा व वस्तुस्थितीला धरून आहे किंवा काय, ते आठ-दहा दिवसांत कळेलच. पाहूया येत्या ४ जून रोजी कोणता निकाल बाहेर येतो!
हे लक्षात घ्या
ग्रामीण भारतात सत्ताधाऱ्यांविषयी नाराजी आहे. श्रीमंत वर्गात नाराजी नसेल पण कष्टकरी समाजात नाराजी आहे, महागाई, बेरोजगारी याबाबत तरुणांमध्ये नैराश्य आहे. त्यामुळे देखील मतदान यावेळी घटले, असे म्हणता येईल. पण अपेक्षाभंग झाला तरी, मत आम्ही भाजपलाच दिले आहे असे सांगणारेही अनेक तरुण भेटतात, याचे कारण असे की-विरोधात मोठा नेता नाही. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात विश्वासार्ह किंचा प्रबळ असा मोठा नेता म्हणजेच समर्थ पर्याय लोकांना अजून सापडलेला नाही.
पंतप्रधान कोण व्हावे असे वाटते,असा प्रश्न केला की-लोक व नैराश्यात अडकलेले तरुणदेखील मोदींचेच नाव घेतात. याचे कारण विरोधकांना मोठे आश्वासक व प्रबळ नेतृत्व उभे करता आलेले नाही. आता इंदिरा गांधी किंवा राजीव गांधींच्या तोडीचे नेतृत्व काँग्रेसकडे नाही. स्वतः प्रशांत किशोरही मान्य करतात की- पंतप्रधान मोदी यांचा करिश्मा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही. २०१४ सारखा किंवा २०१९ सारखा युफोरिया नाही.
आठ-दहा वर्षापूर्वी मोदींच्या सभांना जेवढी गर्दी व्हायची तेवढी आता होत नाही, असे प्रशांत किशोर नमूद करतात. आपण मत दिले नाही तरी चालेल जितेंगे तो मोदीही ही देशभरातील भावना होती व आहे. त्यामुळे जे काही मतदान झालेय, ते भाजपसाठीच झालेय असे भाजप समर्थक मानतात. काही प्रमाणात त्यात तथ्य आहे.
अर्थात प्रशांत किशोर यांचा दावा काहीजणांना एकतर्फी वाटतोय पण त्या दाव्याकडे दुर्लक्ष करता येत नाही हे येथे नमूद करावे लागेल. त्या दाव्याच्या अनुषंगाने चर्चा घडवून आणणे हे या लेखाचे प्रयोजन आहे.