केंद्रातील भाजपचे नेते हिंदुत्वाच्या विषयावर काहीसे आक्रमक झाल्यानंतर मग गोव्यातील भाजप नेत्यांनाही चेव चढत असतो. भाजप सरकारच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री अलीकडे आपण कसा हिंदुत्वाचा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा पुढे नेत आहोत ते दाखविण्याचा प्रयत्न अधूनमधून करतात. कुणी गोव्याला दक्षिणेची काशी करू, अशा घोषणा करून प्रसिद्धी घेतात, तर कुणी सरसंघचालक भागवत यांच्या गोवा भेटीवेळी संघाच्या पूर्ण गणवेशात उपस्थित राहून संघ प्रार्थना म्हणतात. हा सारा बदल सामान्य गोमंतकीयांची करमणूक करत आहे हे वेगळे सांगायला नको.
गोव्यात पोर्तुगीजकाळात काही मंदिरे पाडली गेली असा सरकारचा दावा आहे. त्या सर्व मंदिरांची नव्याने बांधणी करणे किंवा त्यांचे संवर्धन करणे हे काम गोवा सरकार करील, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत गेली काही महिने जाहीर करत आहेत. मात्र, पोर्तुगीज काळात कोणत्या भागातील कोणते मंदिर पाडले गेले व ते नेमके कधी उभे केले जाईल, त्यासाठी काय पूर्वतयारी आहे वगैरे माहिती पुरातत्त्व खाते स्पष्टपणे देऊ शकत नाही. पोर्तुगीज राजवटीच्या सर्व खाणाखुणा पुसून टाकून नवा गोवा घडवूया ही गर्जना सरकारने मंगळवारी केली आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बेतुल केपे येथील किल्ल्यावरील सोहळ्यात मंगळवारी भाग घेतला. शिवराज्याभिषेक दिन कार्यक्रम गोव्यात अनेक ठिकाणी झाला, हे स्वागतार्ह आहे. पोर्तुगीज राजवटीच्या खाणाखुणा पुसून टाकूया, अशी हाक मुख्यमंत्र्यांनी बेतुलहून गोमंतकीयांना दिली. सरकार जर खरोखर खाणाखुणा नष्ट करण्याविषयी गंभीर असेल, तर सरकारने प्रथम गावांची नावे बदलून सुरुवात करता येईल. अनेक गावांची देवनागरी लिपीतील खरी नावे पोर्तुगीज राजवटीपासून कशा पद्धतीने लिहिली जाऊ लागली ते सरकारने एकदा तपासून पाहावे. गोव्यात जे पर्यटक येतात ते चुकीच्याच पद्धतीने गावांची नावे उच्चारतात. कारण सगळीकडे गावांच्या नावांचे फलकच इंग्रजीत तशा पद्धतीने लावले गेले आहेत. हरमल न म्हणता आरांबोल म्हटले जाते. साखळी न म्हणता सांकेलिम म्हटले जाते. कोर्तालिम (कुठ्ठाळी), कावेलोसीम (केळशी) आदी अनेक नावे सरकारने अगोदर बदलून दाखवावी.
वास्को शहराचे नामकरण संभाजीनगर करा, कारण ते नाव वास्को द गामाचे आहे, अशी मागणी अनेक गोमंतकीय काहीवेळा करत असतात. सरकारला धाडस आहे का वास्कोचे नाव बदलण्याचे? शेवटी पोर्तुगीज राजवटीतील खाणाखुणा पुसून टाकाव्यात म्हणजे नेमके काय करावे तेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर बरे होईल. पोर्तुगीज राजवटीत गोव्यात पोर्तुगीजांच्याच पुढाकाराने मायनिंग सुरू झाले होते. खनिज खाण धंद्याचे कन्सेशन लीज देण्याची प्रक्रिया पोर्तुगीजांनी सुरू केली होती. ती पद्धत किंवा तो धंदा बंद करता येईल काय? पोर्तुगीजांनी उभ्या केलेल्या आणि वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या इमारती पणजी, मडगाव व अन्य काही शहरांत अजून उभ्या आहेत. त्या वास्तू मोडून टाकून पोर्तुगीजांच्या खाणाखुणा पुसाव्या लागतील काय? सरकारला नेमके काय अपेक्षित आहे ते सांगितले, तर गोमंतकीयांना त्यानुसार कृती करणे सोयीचे व सुलभ होईल. पोर्तुगीजांनी गोव्यात काजू लागवड वाढवली. सोळाव्या शतकात भारतात पोर्तुगीजांनी काजू लागवड सुरू केली. आल्फोन्सो वगैरे आंब्याच्या जाती पोर्तुगीजकालीन प्रयोगांतून पुढे आल्या.
जेजुईत मिशनऱ्यांना त्याचे श्रेय जाते. हे सगळे आता नष्ट करावे काय? ते नष्ट करता येईल काय? पोर्तुगीजांनी गोव्याला समान नागरी कायदा दिला. देशभर आपण त्या कायद्याचा अभिमानाने उल्लेख करतो. खाणाखुणा पुसण्यासाठी हा कायदा रद्दबातल करावा लागेल काय? अनेक ख्रिस्ती धर्मीय आजी-माजी मंत्री, आमदार यांची आडनावे मुळात कशी होती व नंतर ती कशी बदलली याचा शोध घेण्यासाठी सरकारने एखादी समिती नेमावी. शोध पूर्ण झाल्यानंतर राजकीय नेत्यांना त्यांची आडनावे बदलण्यास सरकार भाग पाडील काय? भाजपच्या आमदारांपासून सुरुवात करता येईल. खुणा अनेक आहेत. सरकारने उगाच वरवरच्या दिखाऊ घोषणा न करता प्रत्यक्ष कृतीही सुरू करावी.