वासुदेव पागी, पणजी: राज्यात किती लोक बेरोजगार आहेत याची सरकारकडे माहितीच नाही, मग सरकार बेरोजगारीश झुंजणार कसे आणि बेरोजगारी दूर कशी करणार असा प्रश्न आमदार विजय सरदेसाई यांनी विधानसभेत केला.
सरकारच्या माहितीप्रमाणे १.९६९ लाख लोकांना गोव्यात खाजगी क्षेत्रात रोजगार मिळाला आहे. परंतु या रोजगारा विषयी आणि रोजगार देणारा खाजगी कंपनीची इतर माहितीही सरकारने ठेवणे आवश्यक आहे. या उद्योगांनी राज्यात किती रोजगार निर्माण केले आहेत. त्या पैकी किती रोजगा गोमंतकियांना दिले आहेत. तसेच कोणत्या प्रकारचे रोजगार दिले आहेत. कौशल्याचे रोजगार दिले आहेत? व्यवस्थापकीय पदाचे रोजगार दिले आहेत की केवळ कमी दर्जाचे रोजगार दिले आहेत याची माहितीही हवी आहे असे त्यांनी सांगितले. केवळ ३१९ कंपनीनीच डेटा दिलेला आहे. गोव्यात केवळ इतक्याच कंपनी नाहीत तर यापेक्षाही अधिक कंपन्या आहेत असे त्यांनी सांगितले.
रोजगाराविषयी सर्व माहिती सरकारकडे नसल्याची बाबूश मोन्सेरात यांनी मान्य केले. नोकरी मिळाल्यानंतरही रोजगार विनिमय केंद्रातील नावे रद्द न करता तशीच ठेवली जातात. यामुळे बेरोजगारांची निश्चित संख्या समजत नसल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंतयांनीही अशी यंत्रणा नसल्याचे मान्य केले. परंतु तशा यंत्रणा उभारल्या जातील. इंटिग्रेट कामगार खाते, इंड्ट्री आणि रोजगार विनिमय केंद्राकडून यंत्रणे उभारली जातील असे त्यांनी सांगितले.