लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात गेले काही दिवस ज्या कार्यक्रमाची चर्चा आहे तो लोकमत मीडियाचा 'गोवन ऑफ द इयर अवॉर्डस २०२४' हा सोहळा बुधवार २८ फेब्रुवारी रोजी प्रमुख पाहुणे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत कांपाल पणजी येथे हॉटेल गोवा मॅरियटमध्ये होणार आहे.
सोहळ्यात सुरुवातीलाच 'गोवा व्हिजन २०५०' हे चर्चासत्र होणार आहे. त्यात उद्योगपती श्रीनिवास थेंपो, शेखर सरदेसाई, शांतनू शेवडे, शांताकुमार यांच्यासह मॉडरेटर म्हणून नितीन कुंकळयेकर सहभागी होणार आहेत. या चर्चेत गोवा २०५० साली कुठे असेल आणि तो अधिक चांगला बनविण्यासाठी आपल्याला काय करता येईल यासंबंधीची मते गोव्यातील आघाडीचे उद्योगपती व्यक्त करणार आहेत.
या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सदानंद शेट तानावडे, काँग्रेसचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, विरोधी पक्षनेते युरी आलेमांव उपस्थित राहाणार आहेत.
या सोहळ्यात पोलिस खाते, प्रशासन, आरोग्य, पर्यावरण, फलोत्पादन, क्रीडा, कला व संस्कृती या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान गोमंतकीयांना पुरस्कार दिले जातील. त्यासाठी या प्रत्येक क्षेत्रात पाच नामांकने लोकमतने जाहीर केली आहेत. त्यांना आज सोमवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत वाचकांना मत देता येईल. त्याशिवाय एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी, बेस्ट लेजिस्लेटर, एमर्जिंग पॉलिटिशियन यांची एकमताने निवड करून त्यांना गौरविले जाणार आहे.
गोव्यात आपल्या कर्तृत्वातून कामाचा डोंगर उभा केलेल्या एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा गोवन ऑफ द इयर जीवन गौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे.
नामांकने आणि पुरस्कारांसाठीची निवड माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर, राज्य माहिती आयुक्त संजय ढवळीकर, लोकवेदाचे अभ्यासक आणि थॉमस स्टीफन्स कोकणी केंद्राचे संचालक डॉ. पांडुरंग फळदेसाई, उद्योजक संजय शेट्ये, लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते, लोकमतचे निवासी संपादक सदगुरू पाटील या ज्युरी मंडळाने केली आहे. त्यात लोकांद्वारे होणाऱ्या मतदानाचाही विचार होणार आहे.
गोवा सरकारचे माहिती आणि प्रसिद्धी खाते आणि पर्यटन विभागाचे सहकार्य या सोहळ्याला लाभले आहे.