पणजी : गोवा शालान्त मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा निकाल यंदा मे ऐवजी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याचा मंडळाचा प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी स्पर्धात्मक परीक्षा देता याव्यात यासाठी हा निर्णय घेतला आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात शक्य झाले नाही तर शेवटच्या आठवड्यात मात्र निश्चितच निकाल जाहीर केला जाईल, अशी माहिती विशेष सूत्रांनी दिली. यंदा निकाल लवकर जाहीर करण्यासाठी सर्व कामे गतीने करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. पेपर तपासण्यापासून निकाल बनविण्यापर्यंतची सर्व कामे अधिक गतीने केली जातील, यासाठी विशेष नियोजन केले आहे. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षकांना विशेष प्रशिक्षणही दिले आहे. दहावीचा निकाल मात्र दरवर्षीप्रमाणे मे मध्येच जाहीर केला जाईल. त्याबाबतीत वेळेत बदल केला जाणार नाही.बारावीचा निकाल लवकर लागणे विद्यार्थ्यांसाठी गरजेचे असते. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना अन्यथा अडचण होते. स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांनाही त्यांना बसणे तसेच पसंतीच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळविणेही सोयीचे व्हावे यासाठी निकाल एप्रिलमध्येच जाहीर करण्याचा निर्णय शालान्त मंडळाने घेतला आहे. यापूर्वीही बारावीचा निकाल अगोदर जाहीर करण्याचे प्रयत्न झाले होते; परंतु त्याला यश न आल्यामुळे ठरल्याप्रमाणेच मे मध्येच निकाल जाहीर करावा लागला होता. आता शालान्त मंडळ जास्त गंभीर झालेले आहे. दरम्यान, १ मार्चपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षा या १५ मार्च रोजी संपणार आहेत. यंदा या परीक्षेत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढताना १६ हजार ९०२ विद्यार्थी बसले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी १२००ने अधिक आहेत. इयत्ता आठवीपर्यंत अनुत्तीर्ण (नापास) न करण्याचे धोरण सुरू झाल्यापासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. यंदाची विक्रमी संख्याही नापास न करण्याच्या धोरणाचाच परिणाम असल्याचे शालान्त मंडळाकडून सांगितले जाते.
बारावीचा निकाल यंदा एप्रिलमध्येच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2017 2:27 AM