पणजी: महिन्याभरापूर्वी मनोहर पर्रीकर यांनी जागतिक कर्करोग दिनानिमित्त एक ट्विट केलं होतं. कर्करोगाशी दोन हात करताना पर्रीकर यांनी दाखवलेली प्रबळ इच्छाशक्ती त्या ट्विटमधून दिसली होती. कर्करोगामुळे होत असलेल्या प्रचंड वेदना सहन करत असतानाही ते कायम राज्यासाठी झटत होते. त्यामुळेच त्यांच्या निधनानं एक सच्चा, साधा आणि नम्र राजकारणी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. महिन्याभरापूर्वीच (4 फेब्रुवारी) जागतिक कर्करोग दिन होता. त्यावेळी मनोहर पर्रीकरांनी एक ट्विट केलं होतं. 'मानवी मन कोणत्याही आजारावर मात करू शकतो #WorldCancerDay,' असं पर्रीकरांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. कर्करोगाशी दोन हात करताना पर्रीकर यांनी मोठी इच्छाशक्ती दाखवली. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. काल (रविवारी) त्यांची प्राणज्योत मालवली आणि संपूर्ण देश शोकसागरात बुडाला. 18 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नी मेधा यांचंही कर्करोगानं निधन झालं.
Manohar Parrikar Death: मानवी मन कोणत्याही आजारावर मात करू शकतो; पर्रीकरांचं महिन्याभरापूर्वीच ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 8:49 AM