कुंकळ्ळी ( गोवा) : हृदयाचा गंभीर आजार असलेल्या बालिकेच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्काराबाबत माणुसकीच्या भावनेने न पाहता सीमावाद, भीती, द्वेष यासारख्या भावनांनी पाहिल्यामुळे मृतदेहाचीही फरपट झाली. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना दक्षिण गोवा जिल्ह्यातील कुंकळ्ळी या गावात घडली. या जिल्ह्यातील मडगाव या प्रमुख शहरापासून सुमारे दहा किलोमीटरवर कुंकळ्ळी गाव आहे.मृत्यू झालेल्या आपल्या एक वर्षाच्या मुलीचा मृतदेह त्यांनी दफन केला होता. स्थानिकांना ही बाब कळाल्यानंतर कुंकळ्ळी पोयटोमोडो येथील काही लोकांनी त्यास तीव्र विरोध केला.
या विरोधामुळे शेवटी हा मृतदेह पुन्हा उकरून काढून नंतर मडगाव येथे नेऊन दफन करण्याची वेळ या कुटुंबीयांवर आली. लॉकडाऊनमुळे गोव्यात अडकून पडलेल्या मूळ कर्नाटकातील एका गरीब कुटुंबावर हा दुर्धर प्रसंग रविवारी ओढवला. बारा दिवसांपूर्वी २९ जून रोजी सुरेश लमाणी यांच्या बालिकेचा मृत्यू झाला. दफनविधीसाठी हातात पैसे नव्हते. गावात कोणी ओळखीचेही नव्हते. डॉक्टरांनी मृत्यूचे प्रमाणपत्रही दिले होते. त्यानंतर लमाणी यांनी येथे जवळच असलेल्या एका जागेत पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या तान्हुल्यावर अंतिम संस्कार केले होते.
घटनास्थळी गावकरी जमा झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक थेरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर आणि सहका:यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरेश लमाणी यांनाही पोलिसांनी नंतर शोधून काढले. घटनास्थळी एकत्र झालेल्यांपैकी काहीजणांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी तगादा लावला. शेवटी सासष्टीचे उपदंडाधिकारी जुआंव फर्नाडिस यांना बोलावले.हे कुटुंबीय अशिक्षित आहे. गावाच्या परंपरेनुसार खुली जागा बघून त्यांनी मुलीचा त्या जागेमध्ये दफनविधी केला असावा, अशा भावना पोलिसांनी व्यक्त केली खरी; पण या भावनांचा पराभव होऊन माणुसकीचे दफन होताना पाहावे लागले.नेमके काय झाले?- पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश लमाणी हा मूळ कर्नाटकातील गदग येथील. तो भंगार गोळा करण्याचे काम करतो. त्याच्या एका वर्षाच्या मुलीला जन्मत:च हृदयाला छिद्र होते. त्यावर शस्त्रक्रियाही होणार होती. मात्र, त्यापूर्वीच या बालिकेचे निधन झाले. नंतर दफनविधी नजीकच्या जागेत केला होता.- रीतीरिवाजानुसार तेथे अगरबत्त्याही लावल्या होत्या. याबद्दल गावात गेले काही दिवस लोकांमध्ये कुजबुज सुरू होती. रविवारी काहीजणांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, त्यांना तेथे कुणाला तरी पुरल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. ज्या जागेत मृतदेह दफन केला होता, त्या जमिनीच्या मालकांनी काही आढेवेढे घेतले नाहीत. पण लोक ऐकायला तयार नव्हते. शेवटी मृतदेह पुन्हा उकरून काढून नंतर तो दुपारी मडगावला न्यावा लागला.