लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गुन्हे खात्याच्या कोठडीतून निसटलेला अट्टल गुहेगार सिद्दीकी ऊर्फ सुलेमान याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओमध्ये त्याने 'आपण तुरुंगातून पळालो नाही तर आपल्याला पोलिसांच्या दोन पथकांनीच पळविले' असा दावा केला आहे. रविवारी रात्री सिद्दीकीचे हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली.
सिद्दीकीने या व्हिडिओमधून पोलिसांच्या दोन तुकड्या आपल्याला येथून पळविण्यासाठी सोबत होत्या, असाही दावा केला आहे. त्याने एका व्हिडिओत काही पोलिस अधिकाऱ्यांची नावेही घेतली. त्यात क्राइम ब्रचचे अधीक्षक राहुल गुप्ता, उपअधीक्षक सूरज हळर्णकर आणि इतर काही उपनिरीक्षक तसेच आयआरबीचे दोन कॉन्स्टेबल यांचा सहभाग होता असे तो सांगतो.
काँग्रेसचे नेते सुनिल कवठणकर यांनी पत्रकारांना हा व्हिडिओ दाखविला. हे फार मोठे कारस्थान असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्योशुआ यांचाही या प्रकरणात संबंध असल्याचे कवठणकर यांनी म्हटले आहे.
याबाबत कवठणकर यांनी सांगितले की, या प्रकरणात पोलिसांसह या सर्वांना सहसंशयित करण्यात यावे. व्हिडिओतील आरोपांची चौकशी करावी. त्यांनी हा व्हिडिओ आम आदमी पार्टीचे प्रमुख अमित पालयेकर यांच्याकडून मिळविल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सीबीआय चौकशी करा, पोलिसांनी मला एन्काउंटर करण्याची धमकी दिली होती. पोलिसांनीच मला हुबळीला नेऊन सोडले. यामध्ये दहा ते बारा पोलिसांचा सहभाग होता. मी परत येईन. मात्र, संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची हमी द्यावी. -सिद्दीकी सुलेमान खान
तपास भरकटविण्याचा हा प्रयत्न : कुमार 'गुन्हे शाखेतून पळालेल्या सिद्दीकी उर्फ सुलेमान खानने व्हायरल व्हिडिओत जे सांगितले, ते साफ चुकीचे आहे. तपासाची दिशा भरकटविण्यासाठी तो हे सारे उपद्व्याप करीत आहे' असे पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी म्हटले आहे. 'आतापर्यंतच्या तपासात अमित नाईक वगळता एकही पोलिसाने त्याला मदत करण्यासारख्या गोष्टी केलेल्या नाहीत', असेही कुमार यांनी म्हटले आहे. सिद्दीकीला पकडण्याचे प्रयत्न चालू आहेत असे त्यांनी सांगितले.
अमितचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न
गुन्हे शाखेच्या ताब्यातील अट्टल गुन्हेगार सिद्दीकी उर्फ सुलेमान खानला कर्नाटकात नेऊन सोडल्याबद्दल अमित नाईक जुने गोवा पोलिसांच्या कोठडीत असलेल्या बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईकने रविवारी सकाळी शौचालय सफाईसाठी असलेले फिनेल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली. अमितला गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.
अधीक्षक कौशल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितने जुने गोवे पोलिसांच्या रायबंदर आऊटपोस्टमध्ये असताना तेथील लॉकअपमध्ये हा प्रकार केल्याचे सांगण्यात आले. त्याने शौचालय सफाईसाठी असलेले फिनेल पिण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, ड्युटीवरील पोलिसांनी त्याला तसे करू दिले नाही. त्याच्याकडून ते काढून घेतले.
फिनेल हिसकावले?
दरम्यान, सुत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार अमितने एका स्वच्छता कर्मचाऱ्याच्या हातून फिनेल हिसकावले आणि त्याने प्राशनही केले. त्या महिलेने आरडाओरड केल्यावर जवळच असलेले काही पोलिस धावून आले. त्यांनी अमितकडून फिनेल काढून घेतले. आणि त्याला उपचारासाठी तातडीने गोमेकॉत पाठवण्यात आले. अमितने फिनेल प्यायल्याचे कळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकायांनी तातडीने गोमेकॉमध्ये धाव घेतली. मात्र, दुपारपर्यंत याविषयी माध्यमांना कोणतीच माहिती देण्यात आली नव्हती.
कर्नाटकात शोधमोहीम
कोठडीतील गुन्हेगाराला पळून जाण्यास मदत केल्यामुळे अमितला पोलिस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याच्यामुळे पळालेला अट्टल गुन्हेगार सुलेमान अद्याप सापडलेला नाही. सुलेमान कर्नाटकात लपला असल्याचा संशय पोलिसांना असल्यामुळे कर्नाटक पोलिसांच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची धाव
सकाळी ही घटना घडल्यानंतर अमित नाईकला त्वरित गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गोमेकॉत धाव घेतली.
सुलेमानला १२ नोव्हेंबरला झाली होती अटक
जमीन हडप प्रकरणातील मास्टरमाईंड सिद्दीकी ऊर्फ सुलेमान खान याला पोलिसांच्या विशेष पथकाने सिद्धिकीला १२ नोव्हेंबर रोजी हुबळीतून अटक केली होती. संशयित जमीन बळकाव प्रक- रणातील मुख्य संशयित असून तो २०१२ पासून फरार होता. म्हापशातील एकतानगर हाऊसिंग बोर्ड येथील २० हजारहून अधिक चौरस मीटर जमीन बळकावल्या प्रकरणात ही अटक झाली होती. त्यानंतर त्या जमिनीवरील घरही कारवाई करून पाडून टाकण्यात आले होते.
सुलेमानला लवकर पकडणार : मुख्यमंत्री
जमीन बळकाव प्रकरणातील मास्टरमाइंड सिद्दीकी उर्फ सुलेमान खानच्या मागावर पोलिस आहेत. त्याला शक्य तेवढ्या लवकर पकडून आणण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, सुलेमानला पळून जाण्यास मदत करणारा आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईकला सरकारने तत्काळ सेवेतून बडतर्फ केले आहे. या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. त्याचा शोध विविध पथके घेत आहेत.'
सिद्दीकी उर्फ सुलेमानच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
जमीन हडप प्रकरणातील फरार झालेला संशयित सिद्दीकी उर्फ सुलेमान खान याने म्हापसा प्रथमवर्ग न्यायालयात केलेल्या जामीन अर्जावर उद्या सोमवारी सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे त्याने हा फरार होण्यापूर्वी, ११ डिसेंबर रोजी अर्ज न्यायालयात सादर केला होता. दरम्यान, संशयित फरार झाल्याची माहिती चौकशी पथकाने न्यायालयाला देऊन अर्जाला विरोध केला होता. सुलेमानच्या वतीने अॅड. राकेश नाईक, अॅड. सलमान पठान आणि अॅड. अमित पालेकर यांनी हा जामीन अर्ज सादर केला आहे. अर्जावर न्यायालयाने दि. १३ रोजी सुनावणी निश्चित केली होती; पण त्याच दिवशी पहाटे संशयित फरार झाला. यापूर्वी सिद्दीकीला दोन प्रकरणांत न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता.