पणजी : तुम्ही बियर पिऊ नका, असे मी कुणाला सांगितले नाही. मी फक्त त्याविषयी चिंता व्यक्त केली, असे निवेदन मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी बुधवारी येथे मंत्रलयात पत्रकारांशी बोलताना केले.
आता मुली देखील बियर पितात अशा अर्थाचे विधान पर्रिकर यांनी काही दिवसांपूर्वी जाहिर मुलाखतीमध्ये केल्यानंतर त्याबाबत देशात विविध अर्थानी चर्चा झाली. सोशल मीडियावर तर चर्चेचा महापूर आला. मात्र गेले काही दिवस पर्रिकर यांनी त्याविषयी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यानंतर पर्रिकर यांनी पत्रकार परिषद घेतली व ते पर्यटक, वाढत्या साधनसुविधा, पर्यटकांची वाढती संख्या आणि एका मंत्र्याने पर्यटकांविषयी केलेले विषय यासह आपल्या बियरसंबंधीच्याही विधानाबाबत बोलले. कुठच्याच राजकारण्याने भाषा कठोर वापरू नये. प्रत्येक पर्यटकाचे गोव्यात स्वागत आहे. फक्त रस्त्यावर लघवी करू नये, कुठेही कचरा टाकू नये असे अपेक्षित आहे. केवळ पर्यटकच नव्हे तर स्थानिकांनी देखील रस्त्यावर कचरा टाकू नये, असे अपेक्षित असतेच व आहे, असे पर्रिकर म्हणाले.राजकारण्यांनी केलेल्या विधानाचे विविध अर्थ लावले जातात, असे नमूद करून पर्रिकर यांनी मग स्वत:चे उदाहरण दिले. आपण बियर पिऊ नका असे कुणालाच सांगितले नाही. आपण कुणालाच रोखले नाही. फक्त चिंता व्यक्त केली. आपण भीती देखील व्यक्त केली नाही. चिंता व्यक्त करणो हा माझा मूलभूत अधिकार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. काहीजणांनी सोशल मीडियावरून त्या माङया विधानाबाबत अनेक प्रकारचे अर्थ काढले. काही प्रसार माध्यमे मोठय़ा संख्येने कर्मचा-यांना सेवेतून एकदम कमी करतात, त्याविषयी देखील मी चिंता व्यक्त करतो. चिंता व्यक्त केली म्हणून माङो काही चुकत नाही, असे पर्रिकर यांनी नमूद केले.
दीड कोटी पर्यटकांसाठी गोवा
दरम्यान, मंत्री विजय सरदेसाई यांच्या विधानांच्या अनुषंगाने पत्रकारांनी पत्र विचारताच मुख्यमंत्री म्हणाले की सध्या गोव्यात ज्या साधनसुविधा आहेत, त्या पाहता पन्नास ते साठ लाख पर्यटकांचा भार गोवा पेलू शकतो. मात्र तिसरा मांडवी पुल, नवा जुवारी पुल, पत्रदेवी ते पोळे महामार्ग अशा अनेक साधनसुविधा उभ्या राहिल्यानंतर दीड कोटी पर्यटकांना गोवा सामावून घेऊ शकेल. पर्यटन व्यवसायाचा विस्तार व्हायला हवा. तो अंतर्गत भागांमध्ये विस्तारायला हवा. एका खनिज व्यवसायावर आम्ही अवलंबून राहू शकत नाही आणि केवळ पर्यटनावरच सुद्धा अवलंबून राहू शकत नाही. मी अर्थसंकल्पात पर्यटनाच्या विस्ताराविषयी सविस्तर भाष्य करीन. मंत्र्याला पर्यटकांविषयी जे काही म्हणायचे होते, त्यामागिल हेतू योग्य असावा, फक्त भाषा जास्त कठोर वापरू नये व संबंधित मंत्र्यानेही ते मान्य केले आहे.