पणजी: मी काही कुणाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी चित्रपट बनवित नाही. चित्रपट प्रसारीत झाल्यावर मी रिव्युव्हही वाचत नाही. मला चित्रपटाच्या माध्यमातून जो विचार दाखवायचा आहे तो प्रभावीपणे दाखविण्यासाठी मी प्रयत्न करतो असे विदुथलई -१ या तमिळ चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक वेत्री मारन यांनी ५४ व्या इफ्फीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
चित्रपटासाठी अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला मारन यांचा विदुथलई -१ हा सिनेमा इफ्फीच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला होता. बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना मारन यांनी आपल्या चित्रपट निर्मितीच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. जसजसे त्यांचे चित्रपट हिट होत आहेत आणि पुरस्कारही मिळत आहेत तसतसे त्यांच्याकडून इंडस्ट्रीतील मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्याही वाढणाऱ्या अपेक्षांची पूर्ती करण्यासाठी ते काय करतात असे विचारले असता त्यांनी आपण चित्रपट हे कुणाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी करीत नसल्याचे सांगितले. चित्रपटातून एखादा विचार साकारण्यासाठी हवे असलेले कथानक आपल्याला मिळते ते अधिक चांगल्या पद्धतीने साकारण्याकडे आपला कल असतो.
प्रत्येक चित्रपट दिग्दर्शकाची कार्यपद्धती वेगली असते. ही विविधताही आपली इंडस्ट्री समृद्ध करीत असते. आपल्याकडून कोण कसल्या अपेक्षा बाळगून आहेत याचा आपण पार विचार करीत नसल्याचे ते म्हणाले. एकदा कामाला लागलो गी सोशल मीडियापासून डिस्कनेक्ट होऊन कामाला लागतो असेही त्यांनी सांगितले. आपण ट्वीटरवर फार सक्रीय नाही. त्यामुळे एकाग्र होऊन काम करणे शक्य होते असे त्यांनी सांगितले. त्यांच्याबरोबर त्यांच्या चित्रपटातील तमिळ कलाकार सुरी आणि सिनेमेटोग्राफर आर वेल्राज उपस्थित होते.