पणजी : 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय लष्कराने गोव्यावर हल्ला करून पोर्तुगीजांच्या राजवटीतून गोव्याला मुक्त केले होते. भारत देशाचे अशा प्रकारे गोव्यावर कर्ज होते. मी त्या कर्जाची परतफेड संरक्षण मंत्रीपदी असताना सर्जिकल स्ट्राईकद्वारे केली असे मी समजतो, असे देशाचे माजी संरक्षण मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शनिवारी (15 जुलै ) सांगितले.
सर्जिकल स्ट्राईक हा शेवटी लष्करानेच केला होता पण राजकीय निर्णयाची गरज होती व त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी नियोजनाची गरज होती. माझी भूमिका त्यासाठी कामी आली. गोव्याने देशाला कर्जाची परतफेड करण्याची गरज होतीच. सर्जिकल स्ट्राईकद्वारे ती केली गेली, असे मुख्यमंत्री म्हणाले. दिल्लीत मी ठराविक कालावधीसाठीच केंद्र सरकारला हवा होतो. मला दिल्लीत जाण्याची इच्छा नव्हती. केंद्राने बोलावल्यानंतर मी तिथे गेलो व संरक्षण मंत्री म्हणून मी समाधानकारक काम केले. मी स्वत: त्याविषयी समाधानी आहे, असे पर्रीकर यांनी नमूद केले. मी कुठेही असलो तरी शेवटी मला गोव्यातच राहणे आवडते. माझे हृदय गोव्यातच आहे, असेही पर्रीकर म्हणाले.
भारतीय हवाई दलाला तेजस विमाने माझ्यामुळे मिळाली. माझ्या कारकिर्दीत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या पूर्वी होत नव्हत्या. मेक इन इंडिया संरक्षण दलासाठी उत्कृष्ट ठरले. तेजस लढाऊ विमाने ही माझ्यामुळे आली, असे पर्रीकर म्हणाले. लढाऊ हेलिकॉप्टरचे रुप माझ्यामुळे विकसित झाले, असे पर्रीकर यांनी नमूद केले. सर्जिकल स्ट्राईक हा माझ्या संरक्षण मंत्रिपदाच्या कारकिर्दीतील मोठा टप्पा ठरला. सर्जिकल स्ट्राईकसाठी मोठे नियोजन लागते. त्याकामी मी योगदान दिले असे पर्रीकर म्हणाले.
गोवा सरकारने माहिती तंत्रज्ञान दिवसाचे शनिवार व रविवारी आयोजन केले आहे. शनिवारी आयटी दिवस उद्घाटन सोहळ्यात पर्रीकर बोलत होते. इनफोसिसचे माजी संचालक मोहनदास पै व माहिती व तंत्रज्ञान खात्याचे मंत्री रोहन खंवटे हे यावेळी उपस्थित होते. गोव्याला आयटीचे हब बनवायचे आहे. गोव्यात संगीत, कला, साहित्य, शिक्षण आदी सर्व क्षेत्रांमध्ये गुणी लोक आहेत. आयटी क्षेत्रातील बुद्धिवान गोमंतकीय युवा- युवती बंगळुरू, पुणे आदी ठिकाणी जाऊन काम करतात. मला गोव्यातच आयटीच्या संधी निर्माण करायच्या आहेत. परप्रांतांमध्ये जाणाऱ्यांनी येथेच रहावे व जे गेलेत त्यांनी गोव्याच्या आयटी क्षेत्रात परतून यावे अशा संधी येथे निर्माण करायच्या आहेत. गोव्यात एकेकाळी संधी नव्हत्या म्हणून संगीत क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी मंगेशकर कुटुंबियांनाही गोवा सोडावा लागला होता, असे पर्रीकर म्हणाले.