मी विधानसभेत गंभीरपणेच काम केले - रेजिनाल्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 05:22 PM2019-08-10T17:22:53+5:302019-08-10T17:44:43+5:30
रेजिनाल्डने प्रभावी भूमिका पार पाडली तरी, विरोधकांपैकी अन्य आमदारांना प्रभाव टाकता आला नाही अशी टीका रेजिनाल्ड यांचे समर्थक करतात.
पणजी - गोवा विधानसभेच्या शुक्रवारी (9 ऑगस्ट) संपलेल्या वीस दिवसीय अधिवेशनात मी गंभीरपणे व प्रभावीपणेच माझी भूमिका पार पाडली. काही जणांना मी चेष्टामस्करी केली असे वाटते, ते चुकीचे आहे, असे निवेदन काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी येथे व्यक्त केले आहे. रेजिनाल्ड यांनी लोकमत ऑनलाईसाठी मुलाखत दिली. विधानसभा अधिवेशनात रेजिनाल्ड यांनी इतर काँग्रेस आमदारांपेक्षा जास्त प्रश्न मांडले. ते रोज पूर्णवेळ सभागृहात उपस्थित राहिले आणि त्यांनी रोज कामकाजात भाग घेतला. तथापि, रेजिनाल्ड हे नीट प्रश्न विचारत नाहीत, ते वाहवत जातात अशा प्रकारची टीका काहीजण करतात.
रेजिनाल्डने प्रभावी भूमिका पार पाडली तरी, विरोधकांपैकी अन्य आमदारांना प्रभाव टाकता आला नाही अशी टीका रेजिनाल्ड यांचे समर्थक करतात. याविषयी विचारले असता रेजिनाल्ड म्हणाले की मी दुसऱ्या आमदारांविषयी किंवा काँग्रेस पक्षाविषयीही बोलणार नाही. मी माझ्याविषयीच बोलेन. मी कुठेच वाहवत गेलो नाही. मला सभागृहाच्या कामकाजाचा मोठा अनुभव आहे. मी तिसऱ्यांदा सभागृहाचा सदस्य आहे. मी गोव्याला भेडसावणारे आणि गोमंतकीयांच्याच हिताचे सगळे प्रश्न विधानसभेत मांडले. मी सरकारच्या चुकाही दाखवून दिल्या. मी चेष्टा मस्करी केली नाही.
रेजिनाल्ड म्हणाले, की काही मंत्र्यांना अहंकार आहे. त्यांना अहंभाव जडल्याने ते नीट उत्तरे देत नाहीत. माझा प्रत्येक खासगी ठराव किंवा प्रश्न किंवा प्रत्येक भाषण हे गोमंतकीयांचे हित नजरेसमोर ठेवून सादर झाले आहे. मी कायम लोकांमध्ये असतो. त्यामुळे मला लोकांच्या समस्या कळतात. या अधिवेशनात सभापतींनीही आम्हाला पुरेसा वेळ बोलू दिले आहे. विद्यमान नव्या सभापतींविषयी माझा काहीच आक्षेप नाही. काही जण प्रसार माध्यमांमधून माझ्याविषयी आक्षेप घेतात. मी माझी भूमिका गंभीरपणे व अगदी व्यवस्थित पार पाडली आहे. काँग्रेसच्या अन्य आमदारांची कामगिरी कशी झाली त्याविषयी मी या टप्प्यावर काही बोलू इच्छीत नाही. तसेच मी बोलणे योग्यही नव्हे असंही ते म्हणाले आहेत.