Goa Political Crisis: मी देवाला सगळं सांगितलं, तो म्हणाला...;भाजपा प्रवेशाआधी दिगंबर कामतांनी घेतला देवाचा कौल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 03:37 PM2022-09-14T15:37:34+5:302022-09-14T15:38:05+5:30
पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांना दिगंबर कामत, लोबो वगैरे पुन्हा भाजपमध्ये आलेले हवे होते, त्याप्रमाणे आज सकाळी पक्षांतर घडून आले.
पणजी: काँग्रेस पक्षात आज अपेक्षेनुसार मोठी फूट पडली. दिगंबर कामत, मायकल लोबो, रुदोल्फ फर्नांडिस, आलेक्स सिक्वेरा, केदार नाईक, राजेश फळदेसाई, संकल्प आमोणकर यांच्यासह डिलायला लोबो अशा आठ आमदारांच्या गटाने काँग्रेसपासून फारकत घेतली व भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे सत्ताधारी भाजपचे संख्याबळ विधानसभेत वीसवरून अठ्ठावीसपर्यंत वाढले आहे.
आज सकाळी १० वाजता ११ पैकी आठजण सभापतींच्या दालनात पोहोचले. सभापती दिल्लीत असल्याने विधिमंडळ सचिव नम्रता उलमन यांना हा गट भाजपात विलीन करण्यात येत असल्याचे पत्र सादर करण्यात आले. पक्षांतरे व फोडाफोडीच्या राजकारणाला जनता कंटाळलेली असली तरी, काँग्रेसच्या आठ आमदारांनी मात्र जनभावनेची पर्वा न करता पक्षांतर केल्याने राज्यभरातून संताप व्यक्त होत आहे.
विविध मतदारसंघांमधील भाजप कार्यकर्तेही सून्न झाले आहेत. पक्षाच्या दिल्लीतील नेत्यांना दिगंबर कामत, लोबो वगैरे पुन्हा भाजपमध्ये आलेले हवे होते, त्याप्रमाणे आज सकाळी पक्षांतर घडून आले. आम्ही विकासासाठी व पंतप्रधान मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजपमध्ये जात असल्याचे लोबो यांनी जाहीर केले. कामत व लोबो यांचा हा दुसऱ्यांदा भाजप प्रवेश आहे.
तीनच आमदार शिल्लक
काँग्रेसला गत विधानसभा निवडणुकीत लोकांनी ११ जागा दिल्या होत्या. आठ आमदार भाजपमध्ये गेल्याने आता काँग्रेसकडे फक्त तीन आमदार राहिले आहेत. यात कुंकळ्ळीचे युरी आलेमाव, केपेचे एल्टन डिकॉस्टा आणि हळदोणेचे कार्लुस फेरेरा यांचा समावेश आहे. कार्लुस व एल्टन यांनाही भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांनी करून पाहिला होता, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
देवाने मला सांगितले- दिगंबर कामत
मी देवावर विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी पुन्हा देवाचा कौल घेतला. मी देवापुढे माझे गाऱ्हाणे मांडले, सगळी परिस्थिती सांगितली. त्यावर देवाने मला तुला हवा तो निर्णय घे, मी तुझ्या पाठीशी असल्याचे सांगितले. त्यानंतर आपण भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.
काही मंत्र्यांना डच्चू?
कामत हे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कदाचित मंत्रिपद स्वीकारणार नाहीत. पण लोबो व इतरांना मंत्रिपदे मिळणार आहेत. त्यासाठी भाजपच्या दोघा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाण्याची शक्यता असून ते दोन मंत्री कोण स्पष्ट झालेले नाही.
विधिमंडळ सचिवांना पत्र-
काँग्रेसच्या आठ आमदारांचा फुटीर गट भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी सकाळी १० वाजता विधानसभा संकुलात सभापतींच्या दालनात पोहोचला. सभापती रमेश तवडकर हे दिल्लीला असल्याने हा गट भाजपात विलीन करण्यात येत असल्याचे पत्र विधिमंडळ सचिव नम्रता उलमन यांना सादर करण्यात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप घडला.