पणजी - म्हादई पाणीप्रश्नी मी केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोललो आहे. दोन दिवसांत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची एक बैठक होईल व त्यावेळी काय तो निर्णय होईल व गोव्याला उत्तर येईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले.गोवा व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये म्हादई नदीच्या पाणी वाटपाच्या विषयावरून वाद आहे. कळसा भंडुरा प्रकल्पासाठी म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीत वळविण्यास गोव्याचा आक्षेप आहे. यापूर्वी म्हादई पाणी तंटा लवादाने दिलेल्या निवाड्यालाही न्यायालयात आव्हान दिले गेले आहे. गोव्याला अंधारात ठेवून अलिकडेच केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने कर्नाटकला पत्र दिले. कळसा भंडुरा प्रकल्पासाठी पाणी वळविण्यास केंद्राने कर्नाटकला मान्यता दिली. याबाबतची माहितीही मंत्री जावडेकर यांनीच ट्विटद्वारे जाहीर करताच गोव्यात खळबळ उडाली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाची ही कृती आवडली नाही. विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली तर अनेक निमसरकारी संस्थांनी (एनजीओ) आंदोलन करण्याचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सावंत यांनी गोव्याहून सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेले होते. या शिष्टमंडळाने दिल्लीत जावडेकर यांचीच भेट घेतली व कर्नाटकला दिलेले पत्र मागे घेण्याची विनंती केली. जावडेकर यांनी आपल्याला त्या पत्रविषयी माहिती नव्हती, अधिका-यांनीच ते पत्र दिले असा युक्तिवाद केला. जावडेकर यांनी तत्पूर्वी स्वत:चे ट्विटही डिलीट केले. दहा दिवसांत केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलय गोव्याच्या मागणीविषयी काय तो निर्णय घेईल, असे जावडेकर यांनी गोव्याच्या शिष्टमंडळाला सांगितले होते. कालच्या गुरुवारी दहा दिवसांची मुदत संपुष्टात आली. यामुळे गोव्यात विरोधकांनी पुन्हा टीका सुरू केली. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांना शुक्रवारी पत्रकारांनी विचारताच सावंत म्हणाले, की दहा दिवस शब्दश: मोजायचे नसतात याचे भान लोकांनी ठेवायला हवे. मी स्वत: जावडेकर यांच्याशी शुक्रवारी बोललो आहे. पुढील दोन दिवसांत दिल्लीत काय तो निर्णय होईल.
म्हादईप्रश्नी जावडेकरांशी बोललोय, दोन दिवसांत उत्तर येईल - प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 1:18 PM