लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसा : मी कु ठल्याही परिस्थितीत काँग्रेस पक्ष सोडणार नाही. तसे पक्षातील आपले इतर दोन सहकारी आमदारदेखील पक्ष सोडणार नाहीत. ते पक्षासोबत एकनिष्ठ आहेत, असे विधान हळदोणचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी केले.
म्हापसा येथील गांधी चौकात काँग्रेस पक्षाने शहीद दिनानिमित्त महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून पक्ष कामाला लागल्याचे आमदार फेरेरा म्हणाले. ते म्हणाले, निवडणुकीच्या तयारीचा एक भाग म्हणून रुपरेषा ठरवण्यात आली आहे.
प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यावर भर दिला जाणार आहे. सध्या पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुदतीत आलेल्या अर्जाची समितीकडून छाननी केली जाईल. त्यानंतर पुढील अंतिम निर्णय घेण्यासाठी अर्ज केंद्रीय समितीकडे पाठवले जाईल, असेही फेरेरा म्हणाले.
इच्छुक उमेदवारांची संख्या बरीच आहे. उमेदवारीसंबंधी तसेच एकूण निवडणूक प्रक्रियेवर आपले मत विचारात घेण्यात आले आहे असे ते म्हणाले. लवकरच उमेदवार ठरवण्याच्या प्रक्रियेला मूर्त रुप येईल असे आमदार फेरेरा यांनी यावेळी सांगितले.
सर्व समित्यांशी चर्चा करून ठरवू : खलप
गोव्यातील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जागा जिंकणे हे काँग्रेस पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे पक्षाने सर्वमान्य उमेदवार शोधून त्याला उमेदवारी द्यावी असे माजी केंद्रीय मंत्री तसेच काँग्रेस नेते अॅड. रमाकांत खलप यांनी म्हटले आहे. पक्षाने हा निर्णय अत्यंत कठोरपणे घ्यावा असेही खलप म्हणाले. आपल्या उमेदवारीवर भाष्य करताना ते म्हणाले की, पक्षाच्या सर्व समित्यांसोबत चर्चा केल्यानंतर निवडणूक लढवण्याचानिर्णय मी जाहीर करेन.