पणजी : गोव्यात भाजपाकडे स्वत:चे फक्त चौदा आमदार असून त्यापैकी तीन आजारी आहेत. अशास्थितीत मुख्यमंत्रीपदावरील नेता बदलला तर सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष नाराज होतील व सरकार कोसळेल याची कल्पना गेल्या चोवीस तासांत भाजपामधील अनेक जाणकारांना आली आहे. दुस-याबाजूने विरोधी काँग्रेस पक्षाने सरकारवरील दबाव वाढवला आहे. चोवीस तासांत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजाराविषयीची सगळी कागदपत्रे व त्यांचा आजार तपशीलासह जाहीर करा अशी मागणी गुरुवारी काँग्रेसने केली आहे.
चाळीस सदस्यीय गोवा विधानसभेत सरकारचा सगळा डोलारा हा म.गो. पक्ष आणि गोवा फॉरवर्ड व तिघा अपक्ष आमदारांवर अवलंबून आहे. विरोधी काँग्रेसकडे सोळा आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक आमदार आहे. भाजपाचे चौदापैकी दोन आमदार इस्पितळात आहेत. ते गंभीर आजारी आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनोहर पर्रीकर यांना संरक्षण मंत्रीपद सोडून गोव्यात मुख्यमंत्री म्हणून यावे लागले होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आता वारंवार आजारी होऊ लागल्याने व त्यांचा बहुतांशवेळ उपचारांसाठी जात असल्याने गोवा सरकारला कुणी वालीच राहिला नाही अशी स्थिती झाली आहे. नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा व ऊर्जामंत्री पांडुरंग मडकईकर हे इस्पितळात असल्याने त्यांच्याकडील खातीही मुख्यमंत्र्यांकडेच आहे. सुमारे 26 खाती मनोहर पर्रीकर यांच्या ताब्यात आहे. प्रशासन ठप्प झाल्यासारखी स्थिती असल्याने लोकांमधून तिखट प्रतिक्रिया येत आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे उपचारांसाठी तिस-यांदा अमेरिकेला रवाना झाले. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता ते मुंबईहून अमेरिकेला गेले. लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाला लोकांचा रोष स्वीकारावा लागेल अशी कल्पना आल्याने व लोकभावना संतप्त असल्याची जाणीव झाल्याने भाजपाने तूर्त काही महिन्यांसाठी पर्यायी मुख्यमंत्री म्हणून दुस:या एखाद्या नेत्याची नियुक्ती करता येईल काय याची चाचपणी मंगळवार व बुधवारी करून पाहिली. तथापि, भाजपाचे आमदार डॉ. प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री म्हणून घटक पक्षांना मान्य नाही. तसेच स्वत: मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपण आठ दिवसांतच अमेरिकेहून उपचार घेऊन येईन असे भाजपाच्या कोअर टीमला सांगून नव्या हालचालींविषयी आपली अस्वस्थताही बुधवारी दाखवून दिल्याने भाजपाने आपला विचार बदलला.
- मगो पक्षाचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनी लोकमतला सांगितले, की आमच्या पक्षाचा पाठिंबा हा फक्त मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाला आहे. आम्ही मनोहर पर्रीकर यांनाच पाठिंबा दिलेला असल्याने आम्ही वेगळा विचार करू शकत नाही.
- गोवा फॉरवर्ड पक्षाचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनीही लोकमतशी बोलताना अशीच भावना व्यक्त केली. सध्या मुख्यमंत्रीपदासाठी जागा रिकामीच नाही असे डिमेलो म्हणाले.
- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर हे सध्या दिल्लीत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री बदलाचा प्रश्न नाही. मनोहर पर्रीकर हेच आमचे नेते, असे तेंडुलकर यांनी दिल्लीहून लोकमतला सांगितले.
- आपण स्वत: गुरुवारी रात्रीच विदेशात एका परिषदेसाठी जात आहे. आपण अमित शहा किंवा अन्य कुणा नेत्याला राजकीय चर्चेसाठी भेटण्याचा आता प्रश्न येत नाही, असे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले.